हैदराबाद:
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव हे जखमी झाले आहेत. त्यांना यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केसीआर हे गुरुवारी रात्री एर्रावल्ली येथील स्वत:च्या फार्महाउसमध्ये पाय घसरून पडले होते, यामुळे ते जखमी झाले होते. बीआरएस सर्वेसर्वा केसीआर हे किरकोळ जखमी झाली असून सध्या ते रुग्णालयात तज्ञांच्या देखरेखीत आहेत. लोकांकडून मिळत असलेले समर्थन आणि शुभेच्छा पाहता ते लवकरच बरे होतील. सर्वांच्या प्रेमासाठी आभारी असल्याचे केसीआर यांच्या कन्या के. कविता यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केसीआर यांच्या प्रकृतीसंबंधी चिंता वयक्त केली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर हे लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे. बीआरएसला अलिकडेच पार पडलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.
काँग्रेसने बीआरएसला पराभूत करत राज्यातील 199 पैकी 64 जागा जिंकल्या होत्या. तर बीआरएसला केवळ 39 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या वतीने रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले आहेत.









