वृत्तसंस्था/ गुवाहाटी
येथे सुरू असलेल्या गौहत्ती मास्टर्स सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या कार्तिकेय गुलशन कुमारने डेन्मार्कच्या पाचव्या मानांकीत क्रिस्टोफर्सनचा पराभव करत पुरूष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
23 वर्षीय गुलशन कुमारने या सामन्यात क्रिस्टोफर्सनचा 36 मिनिटांच्या कालावधीत 21-18, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. आता गुलशन कुमारचा पुढील फेरीतील सामना मलेशियाच्या वेई बरोबर होणार आहे. मलेशियाच्या वेईने भारताच्या शुभंकर डे याचा 21-15, 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पुरूष दुहेरीच्या सामन्यात ए. राव आणि व्यंकट हर्षवर्धन यांनी चीन तैपेईच्या चौथ्या मानांकीत वेई आणि झुन यांचा 24-22. 23-21 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विजेता मिथून मंजुनाथ, समीर वर्मा तसेच आयुष शेट्टी यांचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. महिला एकेरीच्या सामन्यात चीन तैपेईच्या युनने भारताच्या मालविका बनसोडचा 21-13, 21-17 तर महिलांच्या दुहेरीतील अन्य एका सामन्यात अश्विनी पोनाप्पा व तनिशा क्रेस्टो यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठताना हुडा व पालक अरोरा यांचा 21-13, 21-8 असा पराभव केला.









