प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे भंडारवाडी येथे खासगी जागा पत्तन विभागाच्या बंधाऱयापासून स्मशानशेडपर्यंत जेसीबीने रस्ता केला जात आहे. या कामाचा आक्षेप वरवडेचे सरपंचावर ग्रामस्थांनी ठेवला आहे. रस्ता कामामुळे येथील कांदळवनाचेही नुकसान झाली असल्याची तक्रार जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.
वरवडेतील ग्रामस्थ प्रसाद पाटील, निखील बोरकर, सुनाद बोरकर यांनी त्याबाबत जयगड पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार मांडली आहे. त्या तक्रारीनुसार वरवडे भंडारवाडी स्मशानभूमीजवळ रस्त्यासाठी जेसीबीने खोदाई केली जात होती. हे काम करताना बोरकर, परकर, पाटील, चव्हाण या जमीन मालकांची कोणतीही संमती घेतली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पत्तन विभागाने खाडी किनारी बांधलेल्या संरक्षक भिंतीजवळूनच हा रस्ता वरवडे भंडारवाडा स्मशानभूमीपर्यंत खोदाई करून बनवण्यात येत आहे. रस्त्याचे जोर जबरदस्तीने खोदकाम करून कांदळवनाचे नुकसान करणाऱया जेसीबी चालक व काम करून घेणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी जयगड पोलिसांकडे करण्यात आली आहे.









