राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीवकुमार यांची माहिती ; सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग
प्रतिनिधी / बेंगळूर
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पाच राज्यांमधील विधानसभांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. याबरोबरच आता राज्यातील बेळगाव लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. पुढील आठवडय़ात पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याची माहिती कर्नाटकाचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीवकुमार यांनी दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांच्या विधानसभांसाठी निवडणुकीची घोषणा केली होती. दरम्यान, राज्यातील बेळगाव लोकसभा, विजापूर जिल्हय़ातील सिंदगी, बिदर जिल्हय़ातील बसवकल्याण आणि रायचूर जिल्हय़ातील मस्की या विधानसभेच्या जागांसाठी शुक्रवारी रात्रीपर्यंत अधिसूचना जारी होण्याची शक्यता होती. मात्र, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी कर्नाटकासह विविध राज्यांमधील लोकसभा आणि विधानसभेच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी वेगळी अधिसूचना जारी करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे राज्यात पोटनिवडणुका केव्हा होतील, याविषयी चर्चा सुरू झालेली असतानाच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीवकुमार यांनी पुढील आठवडय़ात पोटनिवडणूक वेळापत्रक घोषित होणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या दृष्टीने पोटनिवडणूक मिनी महासंग्रामच ठरणार आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे उमेदवार निवडीपासून प्रचाराची रणनिती आखण्यासाठी खलबते सुरू केली आहेत. नेत्यांना आता पोटनिवडणुकीच्या तारखांचे वेध लागले आहेत.









