प्रतिनिधी /म्हापसा
मंत्री मायकल लोबो यांना काँग्रेस पक्षात घेतले हा तमाम कळंगुटमधील कार्यकर्त्यांचा विश्वासघात असून काँग्रेसच्या या वृत्तीचा निषेध करीत काँग्रेस गट समिती बरखास्त करून समितीच्या सर्व पदाधिकाऱयांनी लोबोच्या प्रवेशाच्या निषेधार्थ आपल्या पदाचे राजीनामे दिले. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर या पदाधिकाऱयांनी राजीनामे दिले. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आजपासून काँग्रेस हटावो गोवा बचाओ चा नारा घराघरात पोचविण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. येत्या विधानसभेची निवडणूक एकतर अपक्ष अथवा अन्य पक्षाच्या तिकीटावर लढविली जाईल मात्र याबाबतीत ठोस निर्णय उद्यापर्यंत घेतला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वेळप्रसंगी आपचे उमेदवार सुदेश मयेंकर यांना बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार होत असल्याचेही यावेळी फर्नांडिस यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर कळंगुटचे माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आग्नेल फर्नांडिस, माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा, ऍन्थनी मिनेझीस, गटाध्यक्ष बेनेडिक्ट डिसोझा, इतर सभासद उपस्थित होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांच्यात झालेल्या छुप्या करारानुसार काँग्रेसकडून निवडून येणारे आमदार शेवटी भाजपमयच होणार असल्याचे खात्रीशीपर वृत्त आहे. त्यामुळे मंगळवारी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या मायकल लोबो यांना मत देणे याचाच अर्थ अप्रत्यरित्या भाजपलाच मत देण्यासारखे असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
काँग्रेसचे केंद्रीय नेते गोव्यात माया जमा करण्यासाठी येतात व ज्यांच्याकडून अधिक फायदा होतो अशा लोकांशीच तिकीटे वाटपाचा धंदा केला जातो असे मत कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी व्यक्त केले. सध्याची काँग्रेस ही गांधी नेहरुंची काँग्रेस राहिली नसल्याचे सिक्वेरा यांनी यावेळी सांगितले.









