साळगावकर यांनी केला प्रचाराचा शुभारंभ
प्रतिनिधी /म्हापसा
साळगाव मतदारसंघात पायाभूत सुविधांकडे आम्ही सदैव लक्ष दिलेले आहे. साळगाव मतदारसंघासाठी केंद्रातून 100 कोटी रुपये आलेले आहे. तो निधी शेवटच्या घरापर्यंत पोचविण्यासाठी आपण रात्रंदिन काम करणार आहे. पाच वर्षात भरघोस विकास करण्याकडे भर दिला. साळगाव मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आणि दुपट्टीने गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत अधिक पायाभूत विकास साधण्यासाठी मला सर्वांनी साथ द्या असे आवाहन साळगावचे उमदेवार जयेश साळगावकर यांनी म्हापसा येथे श्री देव बोडगेश्वराच्या प्रांगणात बोलताना केले.
साळगावचे माजी आमदार जयेश साळगावकर यांनी देवी शांतादुर्गा व जागृत देवस्थान श्री देव बोडगेश्वराचा आशीर्वाद घेऊन साळगाव मतदारसंघातून प्रचार कार्यास सुरुवात केल्यावर कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. यावेळी खासदार श्रीपाद नाईक उपस्थित होते.
पाच वर्षात चौफेर विकास साधू
पुढे बोलताना श्री. साळगावकर म्हणाले की, साळगाव मतदारसंघात आपण सदैव न्याय दिलेला आहे. आजवर विविध कामे हाती घेतली. काही प्रकल्प पूर्णत्वाकडे आले तर काही बाकी आहेत. सर्वसामान्य जनतेला सदैव सहकार्य केले व यापुढेही करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून साळगावच्या चौफेर विकासासाठी आणि राहिलेली कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन साळगावकरांनी केले.
घरोघरी प्रचारावर भर दिला असला तरी निवडणूक आयुक्तांचे कायद्याचे पालन करून अवघे 10 कार्यकर्ते घेऊन आम्ही घरोघरी प्रचारावर भर देमार असल्याची माहिती त्यांनी दिली. वीज, पाणी, रस्ते, स्मशानभूमी आदी कामाकडे सातत्याने लक्ष देऊन आम्ही पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले.
लोबोवर कारवाई करण्यास पक्षश्रेष्ठी त्यावेळी अपयशी ठरले
जयेश साळगावकरांनी प्रचाराला नारळ ठेवून शुभारंभ केला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत राज्यात भाजपच सत्तेवर येईल. असे श्रीपाद भाऊ म्हणाले. भाजप सारख्या पक्षाचा विश्वासघात करणारे कधी सुखी होत नाही. भाजपला मायकल लोबोनी दगा दिला खरा मात्र ते कधी आपल्या कार्यात सफल होणार नाही. भाजप विरोधात त्यांनी पाऊल उचलून विरोधात बोलणे सुरू केले तेव्हाच त्यांच्यावर पक्षाने कारवाई करायला पाहिजे होती. ते करण्यास भाजप पक्षश्रेष्ठी अपयशी ठरले असल्याचा आरोप श्रीपाद नाईक यांनी केला.









