बुधवारी तब्बल 3119 बाधित, दोघांचा बळी
प्रतिनिधी /पणजी
राज्यात कोरोनाचा झालेला उद्रेक दिवसेंदिवस अधिकाधिक प्रखर होऊ लागला असून मंगळवारी सापडलेल्या 2476 रुग्णांच्या संख्येत काल बुधवारी आणखी 3119 रुग्णांची भर पडली आहे. तिसऱया लाटेदरम्यानची आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ नोंदविली गेली आहे. त्याचबरोबर आणखी दोघांचा बळी गेला असून एकूण मृतसंख्या 3539 वर पोहोचली आहे.
सक्रिय कोरोना रुग्णसंख्येने 14 हजारांचा पल्ला पार केला असून तो आकडा 14134 वर पोहोचला आहे. कोरोना संसर्गाचा दर 31.84 टक्के एवढा झाला आहे.
गत 24 तासात राज्यात 1002 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी एकूण 9795 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 3119 बाधित सापडले. त्यापैकी 28 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले, तर 3091 जणांना गृह विलगिकरण देण्यात आले. सहा जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहेत. वर्षभरातील बाधितसंख्या 197096 तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 179423 वर पोहोचली आहे.
मार्गदर्शक तत्वांचा फज्जा
राज्यातील आरोग्य केंद्रनिहाय कोरोना रुग्ण आकडेवारीचा तपशील देण्याचे आरोग्य खात्याने बंद केल्यामुळे कोणत्या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत, ते समजणे मुश्कील बनले आहे. हा तपशील मुद्दाम लपवण्यात येत आहे का? असा सवालही लोक दै. तरुण भारतशी उपस्थित करू लागले आहेत. त्याचबरोबर शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांच्या तुलनेत गोव्यात कोणतेही निर्बंध नसल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही भीतीविना सर्व व्यवहार चालू आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णवाढीस पोषक वातावरण निर्माण होत असून कोरोना मार्गदर्शक तत्वांचा सर्रास फज्जा उडविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
गोमेकॉतील तब्बल 20 डॉक्टर कोरोनाबाधित
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) सुमारे 20 डॉक्टर कोरोनाबाधित झाले असून इतर डॉक्टरांवरील रुग्णसेवेचा ताण वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यांची हॉस्पिटलात दाखल होण्याची संख्याही वाढत आहे. परंतु ते अद्याप ऑक्सिजनवर नाहीत, अशी माहिती गोमेकॉतील सूत्रांकडून मिळाली आहे. डॉक्टरना कोरोनाची लागण झाल्यामुळे इतर डॉक्टर-नर्स यांनाही कोरोना चाचणी करण्याची पाळी आली असून एकंदरीत परिस्थिती चिंताजनक आहे. गोमेकॉतील रुग्णांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
- 12 जानेवारीपर्यंतचे एकूण रुग्ण 197096
- बरे झालेले रुग्ण 179423
- सक्रिय रुग्ण 14134
- 12 जानेवारीचे नवीन रुग्ण 3119
- बरे झालेले रुग्ण 1002
- कोरोना बळी 2
- वर्षभरातील एकूण बळी 3539
उच्च न्यायालयाने सरकारला धरले धारेवर
गोव्यातील कोरोनाच्या तिसऱया लाटेचा उद्रेक झाला तरी त्याचा सामना करण्याची तयारी कुठवर आली याची कल्पनाच सरकारच्या संबंधित खात्यांना नाही. ऑक्सिजन पुरवठा किती आहे याचीही कल्पना नाही. मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवून घेतलेल्या सुमोटो याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारला धारेवर धरून 18 जानेवारी 2022 पर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याशिवाय प्रशासन चालतच नाही, अशी दयनीय स्थिती सध्या असून यापूर्वी दक्षिण गोव्यातील वकिलांनी एकत्र येऊन जनहित याचिका सादर केली वोती व कोरोना व्यवस्थापन प्रकरणी न्यायपीठाने हस्तक्षेप करावा व प्रगती सदैव नजरेखाली ठेवावी, अशी याचना केली होती. याचिका न्यायपीठाने परत सुमोटो पद्धतीने सुनावणीस घेतली व सरकारकडे जाब विचारला. आता आरोग्य खाते व गोमेकॉ व इतर संबंधितांची धावाधाव सुरू झाली असून न्यायपीठाने सरकारला धारेवर धरून येत्या 18 जानेवारीपूर्वी उत्तर हवे असल्याची ताकीद दिली. पुढील सुनावणी 18 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.









