मडगाव:
कोविड 19 विषाणू महामारीमुळे आता देशातील फुटबॉल मोसम अर्ध्यावरच थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. यासंबंधीची शिफारस अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या लीग समितीने एआयएफएफच्या कार्यकारी मंडळाला केली आहे.
शनिवारी ही बैठक लीग समितीचे चेअरमन सुब्रोतो दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे झाली. यावेळी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास, आय-लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनंदो धार, लालंगिनलोवा मार, सॉतेर वाझ, अनिलकुमार, बी. के. रोका, चिराग तन्ना आणि रोचक लँगर यांनी ऑनलाईनद्वारे चर्चेत भाग घेतला.
लीग
समितीच्या बैठकीत 2019-20 देशी फुटबॉल मोसम कोविड 19 प्रादुर्भावामुळे अर्ध्यावरच संपविण्याचे
या बैठकीत ठरले. लीग समितीच्या या प्रस्तावाचा आता एआयएफएफचे व्यवस्थापकीय मंडळ अंतिम
निर्णय घेणार आहे. 14 मार्चपासून आय-लीग तसेच महासंघाच्या इतर स्पर्धा स्थगित करण्यात
आल्या होत्या. आता या स्पर्धा संपल्या असल्याची जाहीर करण्याची शिफारस करण्यात आली
आहे. गुणतक्त्यानुसार मोहन बगानने आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे आपले विजेतेपद 16 सामन्यांतून
39 गुणांनी यापूर्वीच निश्चित केले आहे. आता केवळ लीग समितीच्या शिफारसीवर एआयएफएफ
शिक्कामोर्तब करेल.
मोहन
बगानच्या जेतेपदासमवेत स्पर्धेतील उर्वरीत बक्षीसांची रकम अन्य 10 संघांत विभागण्याची
(एकूण 2.5 कोटी), 2019-20 मोसमात आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील पदावनती रद्द करण्याची तसेच
2020-21 मोसमातील आय-लीग स्पर्धेत खेळण्याच्या पात्रतेसाठी सेकंड डिव्हिजन लीग कमी
अवधींची घेण्याची शिफारसही लीग समितीने फुटबॉल महासंघाकडे केली आहे.









