कोरोनाचा कहर सुरू आहे. आशादायक चित्र दिसणार असे वाटत असतानाच पुन्हा फटका बसतो आहे. जवळ जवळ महिना होत आला. सारे ठप्प आहे, बंद आहे. जीवन गोठले आहे. जीव महत्त्वाचा हे खरेच पण, जीवनही महत्त्वाचे आहे. सारेच ठप्प झाल्याने जगणे कठीण झाले आहे. जीवनशैली बदलली आहे. उद्या लॉकडाऊन संपला आणि कोरोनावर विजय मिळवल्यानंतर नवी जीवनशैली उदयाला येईल अशी लक्षणे दिसत आहेत. सर्वात महत्त्वाचे जगभरच्या अर्थव्यवस्था मान टाकत आहेत. जात, धर्म, देव, सत्ता, पैसा यांचे भ्रम दूर होत आहेत. अंतर वाढले असले आणि हातात हात नसला तरी प्रेम माणुसकी व आत्मियता अधोरेखीत झाली आहे. उद्याचे जग कसे असेल यावर वेगवेगळे तर्क केले जात आहेत. महासत्ता कोण असेल, कुणाचे प्रचंड नुकसान होईल कोण या संकटात संधी साधेल यावर मतांतरे व्यक्त होत आहेत. माणसे तर्क वितर्क करताना दिसत आहेत. या साऱया वातावरणात आलेली चांगली बातमी म्हणजे यंदा भारतात चांगला पाऊस पडणार अशी हवामान खात्याची भविष्यवाणी आहे. मागे चंद्रशेखर भारताचे पंतप्रधान होते तेव्हा भारताचे सोने गहाण पडले होते आणि अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत होती. त्यावर्षी पाऊस चांगला झाला आणि भारताने शेतकऱयांच्या कष्टावर गहाण पडलेले सोने सोडवले होते. यंदा पाऊस चांगला झाला तर शेतकरी ही किमया पुन्हा करेल हे वेगळे सांगायला नको.राज्यकर्त्यांनी हे जाणले आहे आणि शेतीला बळ द्यायचे धोरण स्वीकारले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार गती, प्रगती ठप्प झाल्याने जीवन अवघड झाले आहे. ओघानेच 20 एप्रिलपासून काही उद्योग व्यवसाय सुरू करण्याची घोषणा झाली आहे. शेतीचा खरीप हंगाम जोराचा झाला पाहिजे. जीवनावश्यक वस्तूंचे कारखाने सुरू झाले पाहिजेत. अर्थसंस्थांना शक्ती मिळाली पाहिजे असे धोरण आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी, न द्यावी याबाबत वेगवेगळी मते आहेत. काही देशात कोरोना विरोधी ढाल धोरण आहे. त्यांच्या मते वयस्क, मधुमेही, उच्च रक्तदाब, श्वसन विकारग्रस्त अल्प प्रतिकारशक्तीचे लोक आणि कोरोनाबाधित यांचीच काळजी घेतली पाहिजे. तरुण, मेहनती, शक्तीवान यांना कोंडून ठेवण्यात अर्थ नाही. कदाचित त्यांना कोरोना संसर्ग झाला तर तो बरा होतो. त्यांचा बळी जात नाही. म्हणूनच सोशल डिस्टन्ससह मास्क, स्वच्छता व सरकारी नियम पाळून काही प्रमाणात उद्योग, व्यवसाय व शेती व शेतीपूरक गोष्टींचा प्रारंभ होते. एकीकडे ही नवीन धोरणे आणि नवी नियमावली तयार करत असताना अडचणीत असलेल्या वृत्तपत्रांना फासावर लटकवण्याचा निर्णयच महाराष्ट्र शासनाने घेतलेला दिसतो. म्हणजे लॉकडाऊनमध्ये वृत्तपत्र छापायला, प्रसिद्ध करायला परवानगी असणार पण, घरोघरी वितरण करायला बंदी असणार. मुख्यमंत्री स्वतः काही काळ संपादक होते, आता त्यांची पत्नी संपादक आहे. वृत्तपत्रे चालवणे विशेषतः लहान व मध्यम आकाराचे भाषिक वृत्तपत्र चालवणे ही काय कसरत असते याची जाणीव त्यांना आहे. तरीही असा निर्णय होणे हा मोठा फटका आहे. जग बदलते आहे. तंत्र बदलते आहे. वृत्तपत्राला बदलावे लागणार हे खरे आहे. पण, शासनाने एक फतवा काढला आणि सारे बदलले असे होत नाही. आजही अनेक अफवा उठत असताना माणसे विश्वासार्ह माहितीसाठी वृत्तपत्रावर अवलंबून आहेत. कोरोना विरूद्धच्या लढाईत डॉक्टर, नर्स, पोलीस, प्रशासन यांच्या बरोबरीने मीडियाचा आणि वृत्तपत्र पत्रकार, संपादक व विक्रेत्यांचा सहभाग आहे हे लक्षात घेतले पाहिजे. वाहतूक बंद आहे. कागदाची कमतरता आहे. जाहिराती बंद आहेत, अंक विक्रीची वसुली थांबलेली आहे. रोज तोटा सहन करावा लागतो आहे. कर्मचाऱयांना पगार कसे द्यावेत असा प्रश्न आहे. अशावेळी सरकारने या वॉरियर्सना शक्ती देण्याची गरज होती. पण शक्तीपात झालेल्या प्रिंट मीडियाचा गळा आवळण्याचा प्रयत्न सुरू आहे हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वृत्तपत्र मालकांशी बोलून आपण हा निर्णय घेतला असे म्हटले असले आणि नितीन गडकरींनी वृत्तपत्रांनी आता बदलायला हवे, नवे तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यम आत्मसात करायला हवे असे म्हटले असले तरी आज भारतात लोकशाही व तिचे मूल्य छोटय़ा व मध्यम भाषिक वृत्तपत्रांनी केले आहे. आजही लोकांचा लिखित बातमीवर आणि वृत्तपत्रावर जो विश्वास आहे तो कुणावरही नाही म्हणून एखादा हॉटस्पॉट वगळता राज्यभर वृत्तपत्र छपाई, विक्री, वितरण यांना अनुमती दिली पाहिजे. वृत्तपत्र संघटना, पत्रकार संघटना, वृत्तपत्र विक्रेत्यांचे संघ या विरूद्ध आवाज उठवत आहेत. आंदोलन करत आहेत. पण, शासन ठाम आहे. सरकारला आपला निर्णय बदलण्याची सुबुद्धी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना वृत्तपत्रांनीही किंमत युद्ध, कमिशन युद्ध आणि भांडवली दांडगेपणा यातून बाजूला होत चांगल्या बातम्या, योग्य किंमत आणि वाचक, कर्मचारी, विक्रेते, यांचे हित जोपासले पाहिजे. नवे तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे, बदलले पाहिजे. पण, अनेकांची भाकरी मातीत घालून आणि जीवन उद्ध्वस्त करून नव्हे, मूठभर भांडवली वृत्तपत्राचे मालक म्हणजे पत्रसृष्टी नव्हे यांचेही भान हवे. लोकशाहीचा हा स्तंभ व त्यासाठी काम करणारे सर्व यांचे हित पाहिले पाहिजे. अन्यथा कोरोनाचे जे अनेक बळी गेले त्यात प्रिंट मीडियाचा बळी गेला आणि महाराष्ट्र शासनाने हा बळी घेतला अशी दुर्दैवी नोंद होईल. आजारी, अडचणीत असलेल्या वृत्तपत्रांना वाचकांनी ताकद दिली पाहिजे आणि वृत्तपत्राशी किंमती पलीकडचे नाते जपत वाचकांनी चांगल्या पत्रकारितेचे समर्थन केले पाहिजे. आज घडीची तीच गरज आहे. कोरोना विरूद्धची लढाई लढताना वृत्तपत्राचा बळी जाणार नाही हे पाहिले पाहिजे. कोरोना सावट घोंगावते आहे त्यांचा नियम पाळून आणि सरकारी सूचनांचे पालन करून पाडाव करावा लागेल. देश जिंकणार, माणूस जिंकणार, कोरोनो हरणार पण, या लढाईत मूल्ये, व्यवस्था नष्ट होणार नाहीत हे बघितले पाहिजे.
Previous Articleराजीवडय़ातील कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह
Next Article लीग रद्द करण्याची शिफारस, बगान विजेते
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








