तन्मय दाते / रत्नागिरी :
रत्नागिरीची सोनल पंडित (करंदिकर) विवाहानंतर 2014 पासून मेलबोर्न, ऑस्ट्रेलियात राहतेय. सौरभ सॉफ्टवेअर डेव्हलपर तर सोनल ह्युमन रिसोर्स विभागात काम करते. त्यांना सारा ही दोन वर्षांची मुलगी आहे. सोनलचे आई-बाबा प्राची व चंद्रशेखर करंदिकर हे दोघेही सध्या त्यांच्यासमवेत मेलबोर्नमध्येच आहेत. ते भारतात परतण्यापूर्वीच लॉकडाऊन झाल्याने त्यांना तेथेच थांबावे लागले. नातीचा सहवासात वेळ उत्तम जात असला तरी क्षणाक्षणाला भारताची, येथील नातेवाईक, मित्रमंडळींची खूप आठवण येते… गावाकडे कलमांचे काय झाले असेल, आंबे तयार झाले असतील का…असे प्रश्नही त्यांना सारखे सतावत आहेत.
कोरोनाचा परिणाम ऑस्टरेलियामधेही झाला आहे. ऑस्ट्रेलीयन नागरिक व सध्या तेथे रहात असलेल्यो कोणालाही आंतरराष्ट्रीय प्रवासाची परवानगी नाही. प्रत्येक राज्यात परिस्थितीनुसार वेगवेगळी बंधने आहेत. आम्ही जेथे राहतो त्या मेलबोर्नमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन नाही. धान्य, फळे. भाजीपाला, औषधे वगैरे आवश्यक गोष्टी आणण्यासाठी बाहेर पडता येते. सद्यस्थितीत साडेसहा हजारापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा पोचलाय आणि 65च्या जवळपास लोकांनी आपला जीव गमावलाय. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार प्रसार नियंत्रणात आहे. यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
कडक निर्बंध अन् जबर दंड
कोविड-19 चा प्रसार रोख़ायला आस्ट्रेलियन शासन विविध निर्णय घेत आहे. गरजेनुसार बदल केले जात आहेत. येथे पूर्णत: लॉकडाऊन नसले तरीही कडक निर्बंध मात्र आहेत व ते मोडल्यास जबर दंडही ठोठावला जातोय. दोनपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याला बंदी आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडता येत नाही. सर्व नागरिकही याला चांगला प्रतिसाद देत आहेत. दोन माणसांमध्ये किमान दीड मिटरचे अंतर व अन्य बाबी पाळल्या जात आहेत. नियम मोडल्यास 10 हजार डॉलर्सपर्यंतही दंड ठोठावण्यात आलाय
शासनाकडून भरघोस मदतीचा हात
सरकार विविध घटकांना मोठय़ा प्रमाणात मदत करत आहे. ज्यांना आपली डॉटेल्स, पॅफेज व अन्य दुकाने पूर्ण बंद ठेवावी लागली आहेत, त्यांना काही अटींची पूर्तता होत असेल तर दरमहा 3 हजार डॉलर्स दिले जाणार आहेत. व्यावसायिक भाडेकरूंनाही मदत दिली जाणार आहे. हॉस्पिटल्सनाही विशेष मदत दिली जात आहे. भारतातही मोठय़ा प्रमाणात धान्य व अन्य स्वरुपातील मदत सुरु असल्याचे समजते. पुढच्या काळात व्यवसाय व उद्योगांनाही मोठय़ा प्रमाणात मदत करावी लागेल, असे सोनम म्हणते.
भारताने कोरोनाला गांभिर्याने घेतले याचा आनंद
ऑस्ट्रेलियामध्ये झालेला कोरोनाचा प्रसार हा सामान्यपणे पर्यटक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करून आलेल्या नागरिकांमुळे झाला. येथे कम्युनिटी ट्रान्स्फरचे प्रमाण अत्यल्प असल्याने नियंत्रण राखणे सोपे जाईल, असे म्हटले जात आहे. भारताने योग्य वेळी निर्णय घेत कम्प्लीट लॉकमडाऊन केला. लोकसंख्येचा व उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा विचार केला तर भारताला हा निर्णय घेणे भाग होते. पंतप्रधान व सर्व मुख्यमंत्र्यांनी कोविड-19 हा विषय लाईटली घेतला नाही व भारताला योग्य संरक्षण प्राप्त करून दिले, याचा आनंद होतो.
आई-बाबांचा अधिक सहवास लाभतोय
माझे आई-बाबा दोघेही रत्नागिरीत असतात. ते फेब्रुवारीमध्ये मेलबोर्नला आले होते आणि 19 एप्रिलला ते भारतात परतणार होते. परंतु त्याचवेळी लॉकडाऊन सुरु झाल्याने ते येथेच राहिले आहेत. आम्ही सगळेच एकत्र असल्यामुळे एकमेकांची लांबून काळजी करत राहणे, ही गोष्ट संपली. आणखी 1-2 महिने आम्हाला एकत्र रहायला मिळणार, याचा आनंद आहे. अर्थात त्यांचे रोज भारतातील सर्व नातेवाईक, मित्रमंडळींशी फोनकॉल्स सुरूच आहेत. बागेत आंबे किती लागले असतील… ‘बंडय़ा’ची तब्येत कशी आहे … पाऊस जवळ आलाय … नवीन झाडं लावायची आहेत …असे भारतातले विषय कायम त्यांच्या डोक्यात आहेत. आम्हीं रोज टीव्हीवर तिकडचा बातम्या पाहतो, ऑनलाईन पेपर वाचतोय रत्नागिरीची अधिक तीव्रतेने आठवण येतेय. आम्ही येथे योग्य ती काळजी घेतोय, भारतातील सर्वांनीही चांगली काळजी घ्या, शासनाच्या सूचना पाळा, असे आवाहन सोनमने केले.









