नुकसान भरपाईसाठी शिफारस पत्र देण्यासाठी मागितली 30 हजाराची लाच
वार्ताहर/ घटप्रभा
अतिवृष्टीमुळे घर कोसळलेल्या घर मालकास सरकारकडून मदत निधी मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले शिफारसपत्र देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱया तलाठय़ास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडल्याची घटना मुडलगी तालुक्यातील मसगुप्पी येथे घडली. अशोक तळवार असे त्या संशयित आरोपी तलाठय़ाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अरभावी येथे राहत असलेल्या आनंद धर्मट्टी यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले आहे. त्यामुळे त्यांनी शासनाकडे मदत मिळविण्यासाठी अर्ज केला होता. ही मदत मिळावी यासाठी शिफारसपत्र देण्याची मागणी त्यांनी मसगुप्पी येथील तलाठी अशोक तळवार याच्याकडे केली होती. त्यानुसार सदर शिफारसपत्र देण्यासाठी तळवार याने धर्मट्टी यांच्याकडे 40 हजार रुपयांची मागणी केली. अखेर 30 हजार रुपये देण्याचे ठरले. यापैकी 15 हजार रुपये पहिल्या टप्प्यात देण्यास सांगितले. धर्मट्टी यांनी याची माहिती लाचलुचपत विभागाला कळविली. त्यानुसार विभागाने सापळा रचून तलाठय़ास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तळवार याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.









