तालुक्यातील 11 जणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून जिल्हय़ात 29 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. शहर व उपनगरांतील 10 तर ग्रामीण भागातील एक असे तालुक्मयात एकूण 11 जण कोरोना बाधित आढळले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना बाधितांच्या आकडय़ामध्ये वाढ होत चालली आहे. पहिल्यापेक्षा ही संख्या कमी झाली आहे. असे असले तरी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. कारण कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासनातर्फे सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. मात्र जनतेनेही सहकार्य करण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः हताश झाली आहे. संपूर्ण कोरोनाचे उच्चाटन झाले तरच दिलासा मिळणार आहे. जिल्हय़ामध्ये पहिल्यापेक्षा रुग्ण आता कमी आहेत. सिव्हिल हॉस्पिटल तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार देण्यात येत आहेत. मंगळवारी शहरातील टिळकवाडी, काकतीवेस, शिवाजीनगर, चन्नम्मानगर, सदाशिवनगर, वडगाव यासह इतर परिसरात रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात करडीगुद्दी येथे रुग्ण आढळून आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे तसेच सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बरेच जण मास्क नसताना तसेच कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र यामुळे संपूर्ण शहर व परिसरालाच धोका निर्माण होवू शकतो. तेंव्हा प्रत्येकाने पूर्वी सारखीच काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.









