सिटीझन कौन्सिलचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढत आहे. असे असताना शहरामध्ये पार्किंग करण्यासाठी जागा मात्र नाही. स्मार्टसिटीची कामे सुरू असल्यामुळे आणखीनच गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे वाहन चालक कोठेही पार्किंग करत आहेत. मात्र त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे, हे योग्य नाही. प्रथम पार्किंगसाठी शहरात विविध ठिकाणी जागा उपलब्ध करावी. त्यानंतरच वाहन चालकांवर कारवाई करावी. दंड घेणे महत्वाचे नसून प्रत्यक्षात वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे असून याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी सिटिझन कौन्सिलतर्फे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
बेळगाव शहर हे महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर वसलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातूनही खरेदीसाठी जनता शहरात येत असते. बेळगावचे महत्व वाढले आहे. असे असताना रहदारी पोलिसांकडून वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. गोवा किंवा महाराष्ट्रातून येणाऱया वाहनांना अधिक लक्ष्य केले जात आहे. ते थांबणे गरजेचे आहे. खरेदीसाठी हे सर्व जण बेळगावात येत असतात. त्यामुळे त्याचा व्यवसायिकांना मोठा फायदा होतो. त्या माध्यमातून सरकारलाही मोठा कर मिळतो. तेंव्हा इतर राज्यातून येणाऱया वाहनांवर निर्बंध तसेच त्यांच्यावर कारवाई करणे हे योग्य नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे.
रहदारी सुरळीत करण्यासाठी नियोजन करणे ही काळाची गरज आहे. कारण दररोज नवीन 150 वाहने रस्त्यावर येत आहेत. भविष्यात आणखीनच रहदारी वाढणार आहे. त्यामुळे प्रथम पार्किंगसाठी झोन बनवावेत तसेच इतर सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. कोणतेही नियोजन न करता थेट कारवाई करणे हे चुकीचे आहे. एक तर कोरोनामुळे सर्वसामान्य जनता विविध संकटांना तोंड देत आहे. त्यातच दंड आकारणी सुरू आहे. त्यामुळे जनता नाराज आहे. याचबरोबर योग्य प्रकारे पार्किंगसाठी जागा उपलब्ध करा त्यानंतर जर वाहन चालक बेजाबदारपणे पार्किंग करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अवजड वाहतूक शहराच्या बाहेरुन जाणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करणे महत्वाचे आहे. बाजारपेठ तसेच संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविणे गरजेचे आहे. कारण चोरी व इतर अनुचित प्रकार घडणार नाहीत. तेंव्हा पार्किंग बरोबरच सीसीटीव्ही कॅमेरेही बसविणे महत्वाचे आहे. पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱयांविरोधात धडक मोहीम राबविली. त्याबद्दल पोलीस खाते आणि गृह विभागाचे अभिनंदन देखील यावेळी करण्यात आले आहे.
बसवराज बोम्मई यांची सरकारी विश्रामधाम येथे भेट घेवून निवेदन देण्यात आले. गृहमंत्र्यांनी निवेदन स्वीकारुन तातडीने पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांना वाहतूकीची समस्या सोडविण्याबाबत सूचना केली. यावेळी सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, राकेश कलघटगी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
गोवा राज्याकडे चोर्लामार्गे वाहने जाताना त्या वाहनात चढुन चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून कर्नाटकच्या सीमेपर्यंत रात्रीच्यावेळी गस्त घालावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.









