रामभाई मोकारिया अन् दिनेश प्रजापति यांना संधी
वृत्तसंस्था/ गांधीनगर
भाजपने गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागांवर होणाऱया पोटनिवडणुकीसाठी दिनेशभाई प्रजापति आणि रामभाई मोकारिया यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल आणि भाजपचे अभय भारद्वाज यांचे निधन झाल्याने रिक्त झाल्या होत्या. दोन्ही उमेदवार गुरुवारी स्वतःचा अर्ज भरणार आहेत.
काँग्रेसने दोन वेगवेगळय़ा निवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे भाजपला दोन्ही उमेदवार निवडून आणण्यास मदत मिळणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 18 फेब्रुवारी आहे. अर्जाची पडताळणी 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 1 मार्च रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी होईल.
रामभाई मोकारिया हे मारुति कुरियर्सचे संस्थापक व्यवस्थापकीय संचालक आहेत. तसेच राजकोटमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते राहिले आहेत. रामभाई 1974 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. तर 1978 मध्ये त्यांनी जनसंघात प्रवेश केला होता. मोकारिया हे ब्राह्मण समुदायाच्या पार्श्वभूमीचे आहेत. तर बनासकांठाचे रहिवासी असलेले दिनेश प्रजापति अन्य मागास समुदायाशी संबंधित आहेत. भाजप बक्शीपंच मोर्चाचे ते प्रमुख आहेत.
भाजपचा दावा मजबूत
गुजरातमध्ये भाजपचे 111 तर काँग्रेसचे 65 आमदार आहेत. राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी 50 टक्के किंवा 88 मते आवश्यक आहेत. मागील वर्षी भाजपने अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी सोडलेल्या सदस्यत्वामुळे रिक्त झालेल्या जागांवर विजय मिळविला होता. 2019 मध्ये एका जागेवर विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी विजय नोंदविला होता. अक्ष तसेच अन्य पक्षांच्या मदतीने भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होणे जवळपास निश्चित आहे.









