आतापर्यंत सापडले 34 मृतदेह, 7 बचावले
भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील निधी जिल्हय़ात रामपूर नैकिन येथे प्रवासी बस कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात किमान 40 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे. आतापर्यंत 34 मृतदेह हाती लागले असून आपत्ती निवारण कार्य सुरू आहे. बसच्या चालकासह 7 जणांनी पोहून आपले प्राण वाचविले. मध्यप्रदेश सरकारने अपघाताच्या चौकशीचा आदेश दिला असून प्रत्येक मृतामागे 5 लाख रूपये भरपाईची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातासाठी दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कार्यालयानेही भरपाईची घोषणा केली आहे.
ही दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या आपसपास घडली. अपघातग्रस्त बस सिधी येथून सतना येथे जात होती. बसमध्ये 50 प्रवासी होते. रस्त्यावर क्रीकेट खेळणाऱया मुलांना चुकविण्यासाठी चालकाने बस रस्त्याच्या एका बाजूला घेण्याचा प्रयत्न चालकाने केला. त्यात त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस बाजूच्या कालव्यात कोसळली, असे सांगितले जात आहे. चौकशीचा आदेश देण्यात आला असून चौकशी अहवालानंतरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
अमित शहांचा कार्यक्रम स्थगित
मंगळवारीच भोपाळ येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तथापि, या भीषण अपघातानंतर तो स्थगित करण्यात आल्याची घोषणा प्रशासनाने केली. या कार्यक्रमात शहा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाग घेणार होते. एक लाख गरीब कुटुंबांना घरे प्रदान करण्याचा आणि या घरांच्या वास्तुशांतीचा हा कार्यक्रम होता.









