कॅ. अमरिंदरसिंग सत्ता गेल्याने पाण्याविना तडफडणाऱया माशासारखे झाले आहेत आणि आपण लवकरच काँग्रेसला राम राम ठोकणार तसेच निवडणुकीत काँग्रेसला ठोकणार असे प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सांगत आहेत.
देशाच्या राजकारणात करमणुकीची अजिबात कमतरता नाही हे गेल्या आठवडय़ात परत एकदा दिसून आले. करमणूक कर न भरता भरपूर मनोरंजन. पंजाबमध्ये दलित कार्ड हुकमाच्या एक्क्मयाप्रमाणे खेळल्यावर आता आपण येती विधानसभा निवडणूक जणू जिंकलीच असे समजून आपल्या नसलेल्या मिशांना राहुल गांधी पीळ देत होते. ते अशा स्वप्नरंजनात असतानाच त्यांनी राजकारणात खास बळ दिलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळेच मुसळ केरात घातले.
कॉमेडी सर्कसमधील लोकांना प्रत्यक्ष राजकारणात एवढे भले मोठे पद दिले की ट्रजेडी होणारच, असे आता टीकाकार खवचटपणे म्हणत आहेत. माकडाच्या हाती कोलीत दिलेत तर तो मर्कटलीला करणार नाही तर काय करणार असाच त्यांचा सवाल आहे. सिद्धू यांनी ज्यांचे मुख्यमंत्रीपद घालवले ते कॅ. अमरिंदरसिंग सत्ता गेल्याने पाण्याविना तडफडणाऱया माशासारखे झाले आहेत आणि आपण लवकरच काँग्रेसला राम राम ठोकणार तसेच निवडणुकीत काँग्रेसला ठोकणार असे प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सांगत आहेत. पतियाळा संस्थानचे महाराज असले तरी मुख्यमंत्रीपद गेल्याने त्यांचा इतका जळफळाट झाला आहे की राहुल व प्रियंका गांधी त्यांना आता ‘खुळी मुले’ वाटत आहेत.
पंजाबमधील या अकल्पित घटनांमुळे ज्यांची चांदी झाली ते चरणजीतसिंग चन्नी यांनीच मुख्यमंत्री म्हणून आपली पकड वाढावी याकरता गुगुली टाकून सिद्धूना राजीनामा देणे भाग पाडले असे म्हणतात. गमतीची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि भूपेश बाघेल हे सिद्धुंच्या मर्कटलीलांनी आतल्या आत खुश झाले आहेत. याला कारण कीअमरिंदरना हटवल्यानंतर राहुल-प्रियंका यांचा मोर्चा राजस्थान आणि छत्तीसगडकडे वळणार होता. गेहलोत विरोधक सचिन पायलट यांच्याशी राहुल-प्रियंका नुकतेच भेटले होते. छत्तीसगढमध्ये जे÷ मंत्री टी. एस. सिंगदेव यांना राहुलनी अगोदरच बोहल्यावर बसवल्यासारखे केल्याने बाघेल अस्वस्थ झाले होते. पंजाबमधील राजकीय नाटकामुळे गेहलोत आणि बाघेल यांची खुर्ची वाचली आहे.काही प्रसारमाध्यमे मोदी सरकारची एवढी लाळघोटी झाली आहेत की आपली स्वामीभक्ती दाखवण्यासाठी विरोधी पक्षांना ती नेहमी धारेवर धरतात. गेल्या आठवडय़ात एका मोठय़ा मीडिया हाऊसच्या इंग्लिश वृत्तवाहिनीच्या महिला अँकरने पंजाब प्रकरणाविषयी चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांना इंग्लिशमधून चक्क शिवी हासडली. तिने ताबडतोब दिलगिरी व्यक्त केली. मीडिया हाऊसने मात्र झाल्या प्रकाराबाबत अवाक्षरही काढले नाही.
सत्ताधारी गोटातदेखील ‘आनंदच आनंद’
भाजपमध्येदेखील करमणुकीला तोटा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हितचिंतकांनीच गेल्या आठवडय़ात त्यांच्यावर अनावस्था प्रसंग ओढवला आणि त्यांचे हसू केले असे दिसत आहे. पंतप्रधानांच्या नुकत्याच संपन्न झालेल्या अमेरिका दौऱयानंतर समाज माध्यमांवर न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर जागतिक नेता म्हणून मोदींचा गौरव केला जात आहे अशी त्यांच्या भल्यामोठय़ा फोटोसह ‘बातमी’ झळकली. काही तासातच हा धादांत खोटा मामला आहे आणि प्रत्यक्षात मोदी अमेरिकेत ‘नाक कटा आया’ असा टेंड समाज माध्यमांवर गाजू लागला. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱयाविषयी भारतातील प्रसारमाध्यमांनी रकानेच्या रकाने बातम्या दिल्या असल्या तरी न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टमध्ये मात्र एक अवाक्षरही छापले गेले नाही असे दावे केले गेले.
सर्वशक्तिमान असे
पंतप्रधान कार्यालय त्याबाबत मूग गिळून गप्प बसले. पीएमओने मोदींच्या समर्थकांना आवरण्यासाठी काहीही न केल्याने पंतप्रधानांची जगभर नालस्ती झाली. जखमेवर मीठ चोळले ते साक्षात न्यूयॉर्क टाइम्सने. भारतीय पंतप्रधानांचा ‘विश्व नेता’ असा गौरव आम्ही केलेला नाही असे सुचवून आमच्या वर्तमानपत्रात काय छापलेले आहे ते आमच्या वेबसाईटवर असते असे साऱयांना त्यांनी समाज माध्यमांद्वारे स्पष्टपणे सांगितले. मोदींचे म्हणावेसे स्वागत अमेरिकेत झाले नाही अशी कुजबुज वाढत असतानाच पंतप्रधान मायदेशी परतले. मोदी अमेरिकेत गेले असताना तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीना रोममधील एका परिषदेस जाण्यास केंद्राने मज्जाव केला त्यावरून वाद उडाला नसता तरच नवल होते. ‘पंतप्रधान साऱया जगात मिरवून येतात, पण आमच्या नेत्याला बाहेर जायची बंदी’ असा टोला ममताच्या पाठीराख्यांनी मारला.
मुंबईचे वादग्रस्त माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग हे परदेशी फरार झाले आहेत अशा वावडय़ा/वृत्तानी त्यांच्याआड राहून राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र विकास आघाडीला गोत्यात आणण्याचा डाव खेळणारे आपल्याच जाळय़ात अडकत आहेत असे सध्या तरी दिसत आहे. दिल्लीमध्ये मोदी-शहा यांनी नेमलेले वादग्रस्त पोलीस कमिशनर राकेश अस्थाना यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी काहीजण न्यायालयात गेले आहेत.या दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी समाजमाध्यमांवर ‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ असा टेंड सुरू झाला होता हेदेखील देशाच्या राजकारणातील एक चमत्कारिक वळण आहे. महात्म्याला ही कशा प्रकारची आदरांजली आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. जे चालले आहे ते चांगले चालले नाही असेही मानणारा एक गट आहे.
गेल्या आठवडय़ात पेगासस टेलिफोन प्रकरणात सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अखत्यारीखाली एक उच्चस्तरीय तांत्रिक समिती नेमणार होते. तसे झाले नसल्याने का झाले नाही यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही समिती नेमायला अगोदरच उशीर झाला आहे. त्यात अजून उशीर कशामुळे? जर या नाजूक बाबीवर मोदी सरकार आणि न्यायालय यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला असेल तर येत्या काळात राजकारणाला एक सुरस आणि चमत्कारिक वळण मिळेल असे मानणे चुकीचे ठरणार
नाही.
सुनील गाताडे








