पद्मपुराणाच्या उत्तर खंडमधील भागवतमाहात्म्यमध्ये वर्णन येते की नारदमुनींना भारतामधील सर्व ठिकाणे फिरून झाल्यावर वृन्दावनात भक्तीदेवी सांगते इदं स्थानं परित्यज्य विदेशं गम्यते मया अर्थात आता मी विदेशामध्येही जाईन. कालांतराने ह्याच भक्तियोगाच्या प्रचाराची सुरुवात 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रील प्रभुपादांनी सर्व जगभरात केली. त्याचबरोबर 15 व्या शतकात श्रीचैतन्य महाप्रभूंनी केलेली भविष्यवाणीही आज श्रील प्रभुपादांच्या प्रयत्नाने प्रत्यक्षात सर्व जगभरामध्ये खरी ठरताना दिसत आहे. चैतन्य महाप्रभु म्हणाले होते की पृथ्वीते आछे यत नगरादि ग्राम । सर्वत्र प्रचार होईबो मोर नाम ।। अर्थात पृथ्वीवरील सर्व नगर आणि गावांमध्ये माझ्या नावाचा प्रचार होईल. 500 वर्षानंतर 21 व्या शतकात आज आपण पाहतो की जगातील प्रत्येक देशामध्ये प्रत्येक गावामध्ये ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा प्रचार होतो आहे. ज्या जागतिक एकात्मतेची अपेक्षा आज केली जाते ती प्रत्यक्ष आज या ‘हरे कृष्ण’ च्या माध्यमातून होताना दिसत आहे. यात सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व वर्णाचे, सर्व देशाचे, सर्व जातीचे अशी भिन्न भिन्न पार्श्वभूमी असणारे लाखो स्त्री पुरुष एकत्र येऊन हरिनाम संकीर्तन करतात आणि सर्व जगाला दाखवून देतात की गीता भागवत ग्रंथाचा संदेश सर्व जगाला मतभिन्नता बाजूला ठेवून कसा एकत्र आणू शकतो. 16 व्या शतकात संत तुकाराम महाराजसुद्धा हेच हरिनाम संकीर्तन प्रचार करण्यासाठी अवतीर्ण झाले होते. ते एका अभंगात सांगतात, आम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ।। 1 ।। झाडू संतांचे मारग । आडरानी भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरला तो सेवू ।।2।। अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्द ज्ञाने । विषय लोभी मने । साधने बुडविली ।।3।। पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ।। अर्थात आम्ही वैकुंठात वास्तव्य करणारे आहोत, पण व्यासदेव ऋषींनी दिलेल्या वेदप्रणीत मार्गाचे पालन करून दाखविण्यासाठी या भौतिक जगात आलो आहोत. आम्ही अशा वैष्णव संतांनी आखून दिलेला मार्ग साफ करू, कारण या मार्गावर अज्ञानाचे रान वाढले आहे. व्यासासारख्या संतांचे शब्दरूपी उच्छिष्ट आम्ही सेवन करू. सर्व वेद पुराणांचे सार आहे हरिनाम, पण विषयलोभी व्यक्तींनी वेदांच्या नावाखाली स्वतःच्या विचारांचा शब्दघोळ करून लोकांना भ्रमित केले आहे व पारमार्थिक साधने नाहीशी केली. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही श्रीकृष्ण भक्तीचा डांगोरा पिटू (प्रचार करू) आणि त्यायोगे कळिकाळालाही दरारा (भय) उत्पन्न होतो, त्या हरीच्या नामाचा आनंदाने जयजयकार करू.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात हाच हरिनाम संकीर्तनाचा संदेश सर्व जगभर महत्प्रयासाने वयाच्या 70 व्या वषी उतारवयात कोणतीही साधने जवळ नसताना सर्व जगभरामध्ये प्रचार करून एक अभूतपूर्व आध्यात्मिक क्रांती आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी अथक प्रयत्न करून पोचविला. त्यांच्या 125 व्या जयंती निमित्त भारताचे पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी यांनी विशेष स्मारक नाण्याचे लोकार्पण केले. या ऑनलाईन कार्यक्रमाला सर्व जगभरातील लाखो लोक सहभागी झाले होते. श्रील प्रभुपाद यांच्या कार्याचा गौरव करताना पंतप्रधान म्हणाले “हे संपूर्ण राष्ट्राचे सौभाग्य आहे की जेथे आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे तेथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर इस्कॉनचे भक्त श्रील प्रभुपादांची 125 वी जयंती साजरी करीत आहेत. हे जणू साधनेचे सुख आणि संतोष या दोघांच्या एकत्र येण्यासारखे आहे. हाच भाव संपूर्ण विश्वात श्रील प्रभुपादांचे अनुयायी आणि कृष्णभक्त स्वाभाविकरीत्या अनुभव करीत आहेत. विश्वव्यापी कृष्णभक्तांना पाहून असे प्रतीत होते जणू लाखो मने आणि शरीरे एकाच भावनेने जोडलेली आहेत, हीच कृष्णभावना आहे आणि श्रील प्रभुपादांनी संपूर्ण विश्वात याचा प्रचार केला.
भारताच्या वैश्विक चेतनेचा गौरव करीत मान. पंतप्रधान म्हणाले ‘आपल्या सर्व यज्ञमंत्रांचा शेवट इदं न मम्-हे माझे नाही, असा होतो. याचा अर्थ असा की, प्रत्येक गोष्ट संपूर्ण ब्रह्मांडाच्या हितासाठी आहे, संपूर्ण सृष्टीच्या हितासाठी आहे. आपले कर्तव्य आहे की, भारताच्या या दर्शनाला जगापर्यंत पोहचवावे. श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरुंच्या आदेशाला आपले सर्वकाही मानले आणि आज त्यांच्या तपस्येचा परिणाम जगाच्या प्रत्येक भागात पहावयास मिळतो. ‘त्यांनी श्रील प्रभुपादद्वारा प्रदर्शित वैश्विक कल्याणाच्या भावनेची स्तुती करीत सांगितले की ते एकटय़ाने इतके महान कार्य सिद्ध करू शकले तर त्यांच्या आशीर्वादाने आपण सर्वानी मिळून प्रयत्न केल्यास मानवीय चेतनेच्या अशा शिखरावर पोहचू जेथे आपण संपूर्ण विश्वासाठी आणखी मोठी भूमिका निभावू शकू, प्रेमाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहचवू शकू. मानवतेच्या हितासाठी भारत जगाला इतके काही देऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे भारतातील योगाची परंपरा, आत्मनिर्भरतेची परंपरा. श्रील प्रभुपाद नेहमी ज्या आत्मनिर्भरतेविषयी बोलत असत, त्याला आज भारताने आपले प्रमुख उद्दिष्टय़ बनविले आहे. देश आता त्या दिशेने वाटचाल करीत आहे.’’
श्रीमान मोदीजी म्हणाले की, त्यांच्या विदेश दौऱयादरम्यान जेव्हा लोक त्यांचे ‘हरे कृष्णा’ म्हणून स्वागत करतात तेव्हा त्यांना आपलेपणाचा अनुभव होतो, हे पाहून त्यांना गौरव वाटतो. भारतात वेळोवेळी अनेक ऋषी, महषी अवतरित होऊन भक्तियोगाचे पालन आणि प्रसार केला. एकेकाळी स्वामी विवेकानंदांनी वेदान्ताला पश्चिमी देशात पोहचविले आणि जेव्हा विश्वाला भक्तियोग देण्याची वेळ आली तेव्हा स्वामी प्रभुपादांच्या ‘इस्कॉन’ संस्थेने या महान कार्याची जबाबदारी घेतली.
श्रील प्रभुपादांचे गुणगान करीत पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादानी किती खडतर प्रसंगाना सामोरे जात यशस्वीपणे कृष्णभावनेचा प्रसार सर्व जगामध्ये केला याचे विश्लेषण केले. ते भारताचे पूर्व प्रधानमंत्री श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या गौरवाचा दाखला देत म्हणाले ‘श्रील प्रभुपाद ज्यावेळी अमेरिकेत आले त्यावेळी त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याचीही शाश्वती नव्हती इतके आव्हान झेलत श्रील प्रभुपादानी उतारवयात अकरा वर्षात मिळविलेले अफाट यश हा जगाच्या इतिहासातील एक चमत्कारच असू शकतो.’’ सरतेशेवटी समस्त इस्कॉन भक्तांचे आभार व्यक्त करीत ते म्हणाले, “मी इस्कॉनचे भक्त तसेच संस्थेशी निगडित सर्वाना ते करीत असलेल्या विशेष सेवेबद्दल धन्यवाद देतो. आज आपण सत्य, सेवा, साधनेचा मंत्र घेऊन कृष्णसेवा करीत आहात आणि याद्वारे आपण संपूर्ण विश्वात भारतीय संस्काराच्या आदर्शांना प्रस्थापित केले आहे. भारताचा शाश्वत संस्कार आहे, सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु नीरामयः ।। हाच विचार इस्कॉनच्या माध्यमातून कोटय़वधी लोकांपर्यंत पोहोचला आहे.’’ याचवेळी पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादांच्या 125 व्या जयंतीनिमित्त विशेष स्मारक नाण्याचे लोकार्पण केले.
– वृंदावनदास








