स्वतःला वाचविण्यासाठी मुलांना करत आहेत ढाल : घरांमध्ये रशियन सैनिकांकडून लूट
रशिया-युक्रेन युद्धाला 38 दिवस पूण झाले आहेत. रशियाचे सैन्य युक्रेनच्या शहरांवर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करत आहे. दोन्ही देश नुकसानीवरून अनेक प्रकारचे दावे करत आहेत. याचदरम्यान युक्रेनच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने रशियाच्या सैन्यावर मुलांना मानवी ढाल म्हणून वापर करण्याचा आरोप केला आहे.
तुर्कस्तानात दोन्ही देशांदरम्यान झालेल्या बैठकीत कीव्हमधील हल्ले कमी करण्यावर रशिया सहमत झाला होता, त्यानंतर रशियन सैनिकांनी काही प्रमाणात माघार घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल ऑलेक्झेंडर मोटुज्यानिक यांनी रशियाच्या सैनिकांवर नवा आरोप केला आहे. रशियाचे सैनक स्वतःच्या वाहनांना परत नेताना युक्रेनियन मुलांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहेत. रशियाच्या सैन्यताफ्याची माहिती मुलांच्या पालकांनी युक्रेनच्या सैनिकांना देऊ नये म्हणून ते अशाप्रकारचे भ्याड कृत्य करत असल्याचे मोटुज्यानिक म्हणाले.

महिलांसोबत क्रौर्याचा आरोप
रशियाच्या सैनिकांवर लूट आणि बलात्कार यासारखे आरोप देखील झाले ओशत. रशियाचे सैनिक महिलांवर बलात्कार करत आहेत. पुतीन यांच्या सैन्याने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर निर्दयपणे तिची हत्या केल्याचा दावा एका महिलेने केला आहे. युक्रेनचे विदेशमंत्री दिमित्रो कुलेबा यांनीही रशियाच्या सैनिकांनी महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
रशियाच्या सैनिकांकडून लूट
रशियाचे सैन्य कीव्हमधून मागे हटताना घरांमध्ये लूट करत आहे. रशियाचे सैनिक प्रचंड नुकसान झेलल्यावर कीव्हमधून मागे हटत आहेत, यामुळे लोकांच्या घरांमधून इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, बूट इत्यादी सामग्रीची लूट करत आहेत. अशाप्रकारच्या सैन्याचा धिक्कार आहे. आम्ही हा प्रकार कधीच विसरणार नाही आणि त्यांना माफही करणार नाही असे युक्रेनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते ओलेग निकोलेंको यांनी म्हटले आहे.
डोनबासवर लक्ष केंद्रीत
हल्ला कमी करणे आणि रशियाचे सैन्य कीव्हमधून मागे हटण्याच्या आश्वासनावर अमेरिकेला भरवसा नाही. कीव्हनजीकच्या परिसरातून रशियाच्या सैन्याने माघार घेतलेली नाही, तर सैनिकांना पुन्हा तैनात केले असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. रशियाचे सैनिक आता युक्रेनमधील डोनबास भाग ताब्यात घेण्यावर लक्ष केंद्रीत करू शकतात. युद्धाच्या प्रारंभीच रशियाने डोनबासच्या डोनेट्स्क आणि लुहान्स्क भागाला स्वतंत्र देश म्हणून मान्यात दिली होती.









