कर्करोगावरील शस्त्रक्रिया करवून घेतल्याचा दावा ः तज्ञ डॉक्टरांची घेतात भेट
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे जीवन रहस्यांनी भरलेले आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहीर स्वरुपात अत्यंत मर्यादित माहितीच उपलब्ध आहे. तर ब्लादिमीर पुतीन हे थायरॉइड कॅन्सर किंवा पार्किंसंस रोगाने ग्रस्त असल्याचा दावा करण्यात येत आहे. स्वतःच्या प्रकृतीबद्दल पुतीन यांनी कधी कुठलाच खुलासा केलेला नाही. 69 वर्षीय पुतीन यांना तंदुरुस्त राजकारणी म्हणून रशियात ओळखले जाते. परंतु अलिकडेच पुतीन जेव्हा प्रसारमाध्यमांना सामोरे गेले, तेव्हा ते थकलेले आणि कमजोर दिसून आले. याचमुळे त्यांच्या प्रकृतीसंबधी अनेक प्रकारचे कयास वर्तविण्यात येत आहेत.
पुतीन यांच्या ‘स्ट्राँग मॅन’ प्रतिमेत मागील काही वर्षांमध्ये नाटय़मय पद्धतीने बदल झाला आहे. यामुळे ते एका गंभीर आजाराने पीडित असू शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुतीन हे सातत्याने थायरॉइड कॅन्सरच्या तज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात असतात असा दावा एका प्रसारमाध्यमाने केला आहे.
35 वेळा घेतली भेट
मॉस्कोच्या सेंट्रल क्लीनिकल रुग्णालयाचे सर्जन येवगेनी सेलिवानोव्ह हे काळय़ा समुद्राच्या किनाऱयावर असलेल्या पुतीन यांच्या आलिशान निवासस्थानात त्यांना भेटायला 35 वेळा गेले आहेत. सेलिवानोव्ह हे थायरॉइड कॅन्सरचे तज्ञ आहेत. पुतीन हे युक्रेनवर हल्ल्यावेळी वैद्यकीय समस्यांना तोंड देत होते असे काही प्रसारमाध्यमांकडून म्हटले गेले आहे. राजकीय विश्लेषक क्लेरी सोलोवी यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये ‘कर्करोग आणि पार्किंसंस’च्या थेअरीचा खुलासा केला होता.
शस्त्रक्रिया झाल्याचा दावा
पुतीन यांनी शस्त्रक्रिया देखील करवून घेतल्याचा दावा सोलोवी यांनी केला होता. पुतीन यांना एका व्हिडिओ फुटेजमध्ये सातत्याने पाय हलवताना आणि बोटं मोडताना पाहिले गेले आहे, हा प्रकार पार्किंसंस रोगाची लक्षणे दर्शविणारा आहे.









