तिरुपथूर जिल्हय़ात भीषण दुर्घटना
तिरुपथूर / वृत्तसंस्था
तामिळनाडूतील तिरुपथूर जिल्ह्य़ात ट्रक दरीत कोसळून शनिवारी भीषण दुर्घटना घडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 14 जण जखमी झाले. हे सर्व लोक पिकअप ट्रकमध्ये बसल्याचे पोलिसांनी सांगितले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक दरीत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिरुपथूर जिल्हय़ातील सेंबाराई गावातील टेकडीवरील मंदिरात शनिवारी काही भाविक ट्रकमधून देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी घाटमार्गात चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक दरीत कोसळल्याने सर्व भाविक जखमी झाले. काही वेळातच मदत व बचावकार्य करण्यात आले. मात्र, ट्रक खोल दरीत कोसळल्यामुळे घटनास्थळीच काहींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व तपासकार्य सुरू केले आहे.









