शहरासह तालुक्मयातील शिवमंदिरे सज्ज

प्रतिनिधी /बेळगाव
हिंदू तिथीनुसार सर्वात पवित्र व धार्मिक महत्त्व असलेला महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्याने मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली. विशेषतः महादेवाच्या मंदिरांची स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली. यावषीच्या श्रावणमासावर कोरोनाचे सावट असल्याने सामाजिक अंतर राखूनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. यासाठी बेळगाव शहरासोबतच तालुक्मयातील शिवमंदिरे सज्ज झाली आहेत.
व्रतवैकल्याचा महिना अशी श्रावणाची एक वेगळी ओळख आहे. या काळात अनेक हिंदू बांधव मांसाहार वर्ज्य करतात. उपास, देवाची भक्ती, दर्शन, दान केले जाते. यानिमित्त मंदिरांमध्येही विशेष पूजांचे आयोजन केले जाते. बेळगाव शहर व परिसरात अनेक शिवालये असून, त्यामध्ये दररोज वेगवेगळय़ा पद्धतीने आरास केली जाते.
कपिलेश्वर मंदिरात ब्रम्हांडाचा देखावा
दक्षिण काशी अशी ओळख असणाऱया कपिलेश्वर मंदिरात प्रतिवषी मोठय़ा उत्साहाने श्रावणमासाचे आयोजन केले जाते. यावषीदेखील मंदिरात ब्रम्हांडाचा देखावा करण्यात आला आहे. तानाजी गल्ली येथील वसंत पाटील व विनायक पालकर यांनी हा सुंदर देखावा साकारला आहे. श्रावणमासाच्या पूर्वसंध्येला रात्री 12 वाजता महाभिषेक करण्यात आला. पहाटे 5 वा. रुद्राभिषेक तसेच त्रिकाल पूजन केले जाणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली.
कोरोना नियमावलीचे पालन करूनच दर्शन
राज्यात पुन्हा कोरोनाचा धोका असल्यामुळे नाईट कर्फ्यू तसेच विकेंड लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावले आहेत. सामाजिक अंतर व मास्कशिवाय मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. त्यामुळे भाविकांनी नोंद घेणे गरजेचे आहे.









