प्रतिनिधी / वास्को
मुरगाव काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी यंदाचा आंतरराष्ट्रीय महिल दिन दुखवटा दिवस म्हणून पाळला. पालिका निवडणुकीत मुरगाव मतदारसंघात सरकारने महिलांना आरक्षण नाकारल्याच्या निषेधार्थ महिला कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्या, माजी नगरसेवक व जयतारा नारी वॅलफॅअर ट्रस्टच्या श्रध्दा आमोणकर यांनी म्हटले आहे.
सोमवारी श्रध्दा आमोणकर व माजी नगराध्यक्ष भावना भोसले यांच्यासह सबिना शेख, विनी भगत व प्रणिता खोर्जुवेकर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुरगाव मतदारसंघात महिलांना निवडणुक लढवण्यासाठी आरक्षणाचा हक्क नाकारल्या प्रकरणी राज्य सरकार व नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचा निषेध करण्यात आला. सरकारच्या या अन्यायकारक कृतीच्या निषेधार्थ यंदा दुखवटा दिवस पाळून महिलांतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षी जयतारा नारी वॅलफॅअर ट्रस्टतर्फे आंतरराष्ट्रीय महिला साजरा करण्यात येत असे. मात्र, यंदा महिला नाराज असून महिला दिन साजरा करण्यात आला नसल्याचे त्या म्हणाल्या. सरकारने महिलांवर अन्याय केलेला असला तरी मुरगाव मतदारसंघात पालिका निवडणुकीत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील आपल्या पॅनलतर्फे तिघा महिलांना निवडणुक लढवण्यासाठी संधी देण्यात आलेली असल्याची माहिती सौ. आमोणकर यांनी दिली.
पेंद्र सरकार व राज्य सरकारकडून महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे म्हणून प्रोत्साहन देण्यात येत असते. मात्र, इथे सरकार महिलांना मागे खेचत असल्याचे दिसत आहे. या प्रश्नावर सर्वोच्च न्यायलयात महिलांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करून मुरगावची जनताही सरकारला योग्य वेळी योग्य धडा शिकवेल असा ईशाराही श्रध्दा आमोणकर यांनी दिला. सरकारने महिलांचे पंख कापण्याचे काम पालिका निवडणुकीच्या निमित्ताने केलेले आहे. त्यामुळे महिलांना आजचा दिवस साजरा करणे नव्हे तर महिलांना शुभेच्छा देणेही योग्य वाटत नाही असे भावना भोसले म्हणाल्या. महिलांवर अन्याय करणाऱयांना महिलांनी पाठींबा देऊ नये. मात्र, ज्या महिलांना जागतीक महिला दिनाचा अर्थ समजत नाही अशाच महिलां त्यांच्यासोबत राहतील असे भोसले म्हणाल्या.









