संपर्कात आलेले मंत्रीही क्वारंटाईन : राज्यपालांनीही करून घेतली स्वॅब तपासणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलीला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, येडियुराप्पा यांच्या संपर्कात आलेले अनेक मंत्री क्वारंटाईन झाले आहेत. त्यांचे गृहकार्यालय ‘कृष्णा’ आणि अधिकृत निवासस्थान ‘कावेरी’ येथील 10 कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील स्वयंपाकी कर्मचारी, कारचालक आणि इतर काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांमध्ये कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मागील आठवडय़ात येडियुराप्पा यांनी गृहमंत्री बसवराज बोम्माई, राज्यपाल वजुभाई वाला, मंत्री आर. अशोक यांच्यासह अनेक मंत्री-अधिकाऱयांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दोघांवर मणिपाल इस्पितळात उपचार केले जात आहेत. तर त्यांचा मुलगा विजयेंद्र यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरी खबरदारी म्हणून त्यांनी स्वतःला 7 दिवस क्वारंटाईन करून घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांना संसर्ग झाल्याने त्यांच्या प्राथमिक संपर्कात आलेले गृहमंत्री बसवराज बोम्माई, उपमुख्यमंत्री डॉ. अस्वथ नारायण, नगरविकास मंत्री भैरती बसवराज आणि मत्स्योद्योग-धर्मादायमंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. क्वारंटाईन कालावधीत हे मंत्री घरी राहूनच काम करणार आहेत.
राज्यपालांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह
मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी चर्चेसाठी येडियुराप्पा यांनी 31 जुलै रोजी राजभवनात जाऊन राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली होती. येडियुराप्पा यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे राज्यपालांनी स्वॅब तपासणी करून घेतली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे स्वीय साहाय्यक तेजस भट यांनी देखील तपासणी करून घेतली आहे. दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
8 ते 10 दिवस मुख्यमंत्री इस्पितळात
मागील आठवडय़ापासून अनेक कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री सहभागी झाले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन क्वारंटाईन करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना थोडा कफ आहे. ते पुढील 8 ते 10 दिवस इस्पितळात उपचार घेण्याची शक्यता आहे. मागील 4 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.









