3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्कमध्ये होणार स्पर्धा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
थॉमस व उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून भारताला यावेळी सोपा ड्रॉ मिळाला आहे. डेन्मार्कमधील आरहस येथे 3 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
भारताच्या पुरुष संघाचा गट क मध्ये समावेश करण्यात आला असून याच गटात 2016 चे चॅम्पियन्स डेन्मार्क, जर्मनी, अल्जेरिया यांचाही समावेश आहे. महिलांना मात्र चौदा वेळचे चॅम्पियन्स चीन, फ्रान्स, जर्मनी यांच्यासह गट ड मध्ये स्थान देण्यात आले आहे. कौलालंपूरमध्ये सोमवारी बीडब्ल्यूएफच्या मुख्यालयात हा ड्रॉ काढण्यात आला. भारताच्या पुरुष व महिला संघाला या स्पर्धेत पाचवे मानांकन देण्यात आले असल्याचे बीडब्ल्यूएफने सांगितले. 13 वेळचे विजेते इंडोनेशिया व सहा वेळा विजेतेपद मिळविणारे जपान यांना अनुक्रमे थॉमस व उबेर चषकात अग्रमानांकन देण्यात आले आहे.
आधीच्या नियोजनाप्रमाणे ही स्पर्धा 16 ते 24 मे या कालावधीत होणार होती. पण कोव्हिड 19 महामारीमुळे ती 15 ते 23 ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. आता त्याचे पुन्हा एकदा नवे वेळापत्रक घोषित करण्यात आले असून त्यानुसार येत्या ऑक्टोबरमध्ये त्याचे आयोजन होणार आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा झाल्यानंतर बीडब्ल्यूएफने टूरवरील सर्व स्पर्धा रद्द केल्या होत्या.
‘कोरोना महामारीमुळे यावर्षी बॅडमिंटनचे कॅलेंडर पूर्णतः कोलमडले असून ते पुन्हा सुरू करण्यास आम्हीही उत्सुक झालो आहोत. मात्र महामारीची स्थिती लक्षात घेऊन सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यानंतरच त्याची सुरुवात करण्यात येईल,’ असे बीडब्ल्यूएफचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर स्टुअर्ट बोरी
म्हणाले.
थॉमस व उबेर चषक फायनलमध्ये प्राथमिक फेरीनंतर प्रत्येक गटातील पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. 2018 मध्ये झालेल्या याआधीच्या आवृत्तीत भारताच्या पुरुष व महिला संघांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले होते. 2016 मधील उबेर चषकात भारतीय महिलांना उपांत्य फेरीत चॅम्पियन चीनकडून पराभव स्वीकारावा लागला होता तर 2014 मध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत भारतीय महिलांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.









