चार दिवसांतच खड्डय़ांनी उघडली तोंडे!
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर-विजापूर महामार्गासाठी गुहागर ते शृंगारतळीचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. गेली 2 वर्षे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून गुहागर शहर बाजारपेठेत पडलेल्या खड्डय़ांवर महामार्ग ठेकेदाराने काँक्रीटचा मुलामा दिला आहे. मात्र भरलेल्या खड्डय़ांनी 4 दिवसांतच आपली तोंडे उघडली आहेत.
गुहागर-चिपळूण या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. चिखली ते मार्गताम्हानेपर्यंत काँक्रिटीकरण करण्यात आले आहे, परंतु चिखली ते गुहागर रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. मोडकाघर पुलाचे काम या महामार्गाचे काम घेतलेल्या मनीषा कन्स्ट्रक्शनला पावसाळय़ाअगोदर पूर्ण करता आले नाही. परिणामी शृंगारतळीत जाण्यासाठी रानवी, पवारसाखरीमार्गे जादा 15 किलोमीटरचे अंतर कापावे लागत आहे. पुलाचे काम पूर्ण न झाल्याने मोडकाघर ते शृंगारतळी या रस्त्याची डागडुजी ठेकेदाराच्या पथ्यावर पडली आहे, परंतु मोडकाघर ते शहर बाजारपेठेपर्यंत पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले होते.
चार दिवसांपूर्वी मनीषा कन्स्ट्रक्शनच्या कामगारांनी शहरातील एस. टी. स्टँडजवळील चार ते पाच खड्डे भरून जनता व महामार्ग अधिकाऱयांसमोर दिखावा केला आहे. खडीमध्ये थोडे सिमेंट घालून हे खड्डे बुजवले, परंतु या खड्डय़ांनी पुन्हा तोंडे वर काढली आहेत. यामुळे चार दिवसांतच पुन्हा खड्डे पडल्याने आता हा ठेकेदार याकडे लक्ष देणार नाही, अशी अवस्था बनली आहे. बाजारपेठेतील मध्यावर आजही मोठय़ा प्रमाणात खड्डे पडलेले दिसून येत आहेत. ठेकेदाराच्या कामगारांनी शहर नाक्यावर झिरोचे मार्किंग करून दिले आहे, परंतु पडलेल्या खड्डय़ांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे.









