कोरोना प्रतिबंधक लसीकरणादरम्यान डोस देताना वैद्यकीय कर्मचाऱयांना देशातील वेगवेगळय़ा भागांमधून वेगवेगळे अनुभव येतात. यासंबंधी अनेक व्हिडीओ, फोटो आणि बातम्या व्हायरल झाल्याचे बऱयाच ठिकाणी दिसते. काही ठिकाणी लसीसंदर्भात असणारी भीती आणि गैरसमज यामुळे अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. तर काही भागात गर्दीत घुसूनही आणि आडमार्ग स्विकारून लस घेतात.
ग्रामीण भागामध्ये काही जण झाडावर चढून बसतात तर काहीजण कर्मचाऱयांशी लस नको म्हणून हुज्जत घालतात. असाच एक प्रकार नुकताच उत्तर प्रदेशमध्ये घडलाय. ‘एएनआय’ने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या व्हिडीओमध्ये एका नावाडय़ाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आरोग्य कर्मचारी नदीच्या काठी पोहचतात तेव्हा त्याची कोरोनायोद्धय़ांशी जोरदार वादावादी होते.

नावाडी लस नको देऊ असे म्हणत असतानाही वैद्यकीय कर्मचारी त्याला वारंवार विनवणी करतात. मात्र, नकार देऊनही कर्मचाऱयांकडून लस देण्याची बळजबरी होत असल्याचे पाहून ही व्यक्ती तिथून पळण्याचा प्रयत्न करते. बऱयाच प्रयत्नानंतर या व्यक्तीला आरोग्य कर्मचारी पकडताना व्हिडीओत दिसत आहेत. तरीही ही व्यक्ती त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपड करते. हा व्हिडीओ पाहून हे लसीकरण कमी आणि कुस्तीचा फड अधिक वाटत असल्याच्या प्रतिक्रिया बऱयाच जणांनी नोंदवल्या आहेत. उत्तर प्रदेशबरोबरच बिहार, मध्यप्रदेशमध्येही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. मात्र, यातील दुसरी बाजू पाहिल्यास आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी खिडकीचा आधार घेत लस घेतल्याचा व्हिडीओही मध्यंतरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचेही आपल्याला आठवत असेल!









