व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी गुजरातमधील सोमनाथ मंदिराजवळ बांधलेल्या नवीन अतिथीगृहाचे (सर्किट हाऊस) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. ही इमारत 30 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आली आहे. हे अतिथीगृह आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले असून ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे. येथे व्हीआयपी आणि डिलक्स रुम्स उपलब्ध असून एक कॉन्फरन्स आणि ऑडिटोरियम हॉलही आहे. या अतिथीगृहाच्या प्रत्येक कक्षातून समुद्राचे दर्शन घडेल अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. सोमनाथ मंदिराभोवती कोणतीही सरकारी सुविधा उपलब्ध नसल्याचे पीएमओ कार्यालयाकडून सांगण्यात आले.
सोमनाथ मंदिर बांधण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागली. मंदिराचे शिखर सुमारे दीडशे फूट उंच आहे. या मंदिरावरील कलशाचे वजन 10 टन इतके आहे. हे मंदिर 10 वर्ग किलोमीटर परिसरात पसरले आहे. येथे इतर 42 मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या आत गर्भगृह, सभामंडपम आणि नृत्यमंडपही आहे. मंदिराच्या दक्षिणेकडे समुद्राच्या बाजूला एक स्तंभ असून त्याला ‘बाणस्तंभ’ म्हटले जाते. सोमनाथ मंदिरात दरवर्षी देश-विदेशातील सुमारे एक कोटीहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात.









