सीआयडीने महराष्ट्रात जाऊन केली कारवाई
प्रतिनिधी / पणजी
महाराष्ट्रातून गोव्यात गांजा पुरवठा करणाऱयां संशयिताला गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआडी) अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. गांजा प्रकरण मुळासकट नष्ट करण्यासाठी सीआयडी टीम काम करीत आहे. या प्रकरणात आणखीन किती जण आणि कुठल्या प्रदेशातील संशयित अडकलेले आहेत त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव सोमेश गांजील (25 सासोली महाराष्ट्र) असे आहे. गांजा प्रकरणात आणखिन काहीजणांचा समावेश आहे, संशयित सोमेश गांजील हा मध्यस्त म्हणून काम करीत होता. महाराष्ट्रातून गोव्याच्या सिमेपर्यंत गांजा आणून देण्याचे काम सोमेश करीत होता. ठरल्या प्रमाणे संशयिताने गुरुवारी एक किलो गांजा दोडामार्ग येथे गोवा सिमेवर आणि प्रणित पिल्लई याच्याकडे दिला होता. ही माहिती सीआयडी पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरीत कारवाई करून प्रणित याला रंगेहाथ अटक केली होती. संशयित प्रणित याची उलट तपासणी केली असता गांजाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोचल्याचे पोलिसांना कळले. सीआयडी निरीक्षक राहूल परब व त्यांच्या टीमने त्वरीत महाराष्ट्राची वाट धरली व तपास कामाला सुरुवात केली होती. प्रणितला गोवा सिमेपर्यंत गांजा आणून देणाऱया संशय़ित सोमेश याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सीआयडी पोलिसांनी दोडामार्ग येथील पोलिसांच्या सहकार्याने सोमेश याला रविवारी पहाटे अटक केली व गोव्यात आणले आहे. या प्रकरणा मागे आणखीन काहीजणांचा हात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. हाती लागलेल्या संशयितांचा आधार घेऊन मुख्य सूत्रधारापर्यंत पोचण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. पुढील तपास सुरु आहे.









