वाडे-कुर्डी सरकारी हायस्कूलचा उपक्रम, नोट्स, पाठय़पुस्तके, वर्कशीट्स यांचे वितरण, विद्यार्थी आनंदित
प्रसाद तिळवे / सांगे
सध्या ऑनलाईन शिक्षणाचा बोलबाला चालू आहे. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची सेवा सुरळीत उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना ते गैरसोयीचे होत आहे. असे असले, तरी सांगे तालुक्मयातील वाडे-कुर्डी सरकारी हायस्कूलच्या शिक्षकांनी थेट गावात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व नोट्स, पाठय़पुस्तके, वर्कशीट्स यांचे वाटप केले. एका अर्थाने सुमारे चार महिन्यांनंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांचा ऋणानुबंध जागा झाला.
या विद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल पालक वर्गाकडून मुख्याध्यापिका व शिक्षकांचे कौतुक होत आहे. यावेळी बऱयाच दिवसांनी आपले शिक्षक भेटले याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर दिसत होता. तसेच शिक्षकांची विद्यार्थ्यांशी भेट झाल्याने तेही आनंदित दिसत होते. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती देसाई यांनी हा उपक्रम घडवून आणला. उत्साही व धडपडय़ा वृत्तीच्या देसाई यांनी विद्यालयाच्या विकासासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. शाळेचा दर्जा राखणे, शिस्तीचे पालन आणि शालान्त परीक्षेचा निकाल शंभर टक्के आणणे यावर त्यांनी भर दिलेला आहे.
या उपक्रमासंदर्भात बोलताना देसाई म्हणाल्या की, दोन महिने झाले असून कोरोनामुळे शाळा सुरू झालेल्या नाहीत. प्रत्यक्ष चार महिने विद्यार्थ्यांची गाठभेट झालेली नाही. त्यातच ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. बऱयाच जणांना नेटवर्कची अडचण भासत असल्याने यावर मात करण्यासाठी आम्ही गावागावात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आणि त्यांचे मनोबल वाढवायचे असे ठरविले.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा
त्यासाठी शिक्षकांसोबत गावात जाऊन कोविड-19 संदर्भातील सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांशी बातचित केली तसेच नोट्स, पाठय़पुस्तके, वर्कशीट्स यांचे वितरण केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले तसेच विद्यार्थ्यांना कोविडबद्दल माहिती देण्यात आली. तसेच मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी काय करतात, त्यांनी किती अभ्यास केला, काय लिहून काढले याचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भातचे वेळापत्रक आगावू विद्यार्थ्यांना पाठवून देण्यात आले होते. त्यानुसार विलियण येथे दोन ठिकाणी, दापोडा, कुमारी, व्हालशे व वाडे वसाहत क्रमांक 1 येथे विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते, अशी माहिती देसाई यांनी दिली.
मोबाईल नसल्यास घाबरू नये
ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही त्यांनी घाबरू नये. जमत नसल्यास मोबाईल घेऊ नये. नोट्सच्या माध्यमातून अभ्यास करावा. इतर विद्यार्थ्यांसोबत बसा व अभ्यास करा. अन्य शिक्षकांना तसेच आपल्याला फोन कॉल करा. आम्ही तुमच्या मदतीला आहोत असे यावेळी सांगितले. यावेळी काही पालकांनाही भेटता आले. त्यांनाही आम्ही आधार दिला, असे मुख्याध्यापिका देसाई यांनी सांगितले.
पालकांकडून उपक्रमाचे स्वागत
यावेळी पालक शंभू भंडारी यांनी मुख्याध्यापिका देसाई यांनी प्रत्यक्ष गावात जाण्याचा जो उपक्रम राबविला आहे त्याचे स्वागत केले. प्रत्यक्ष संवाद होणे महत्त्वाचे आहे. ऑनलाईन हा मार्ग नाही. पण आता कोरोनाचे संकट असल्याने पर्याय नाही. मोबाईलच्या बाबतीत या भागात नेटवर्कची समस्या आहे. त्यात काहींना मोबाईल कळत पण नाही. अनेक जण मोबाईल घेऊ शकत नाहीत. त्यामुळे हा उपक्रम उत्तम असल्याचे भंडारी म्हणाले. आपल्याला कळत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी घरी बसू नये. शिक्षकांशी तसेच अन्य विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालक-शिक्षक संघाच्या अनिल काकोडकर यांनी समाधान व्यक्त करून ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळत नसेल, तर विद्यार्थ्यांनी अभ्यासापासून दूर न जाता शिक्षकांच्या संपर्कात राहावे, असे सांगितले. शक्यतो दोन-तीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अभ्यास करावा. या हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह शिक्षकवर्ग चांगला आहे, असे सांगून यंदा शालान्त परीक्षेत वाडे सरकारी हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल काकोडकर यांनी अभिनंदन केले.









