शर्विलक मदनिकेला आपण चोरलेले दागिने मदनिकेकडे सोपवतो. तेव्हा ते पाहून ती आश्चर्यचकित होते. ती खोदून खोदून विचारते तेव्हा शर्विलक ते चारुदत्ताच्या घरातून चोरल्याचे कबूल करतो. तेव्हा मदनिका ते परत देऊन येण्यासाठी सांगते. पण शर्विलक त्यासाठी आपली असमर्थता प्रकट करतो. मदनिका चारुदत्ताचा कोणी संबंधित असल्याचे सांगून ते वसंतसेनेकडे परत करण्यासाठी सांगते. शेवटी तो त्यासाठी तयार होतो. ही सारी घटना झरोक्मयातून लपून पहाणारी वसंतसेना ऐकते. ती चारुदत्ताला कोणतीही शारीरिक इजा न होता ही घटना घडली हे ऐकून तिचा जीव भांडय़ात पडतो. मदनिका वसंतसेनेकडे जाऊन सांगते की, ते दागिने तिला परत करण्यासाठी चारुदत्ताचा कोणी संबंधित आला आहे. वसंतसेना हसून त्याला आत येण्याबद्दल सांगते. शर्विलक आत येऊन वसंतसेनेसमोर ते दागिने मदनिकेच्या ताब्यात देतो. ते देताना तो सांगतो, ‘ चारुदत्त महाराजांनी सांगितले आहे की, त्यांचे घर जीर्ण झाल्यामुळे हे दागिने तिथे सुरक्षित राहणार नाहीत. म्हणून हे घ्या!’
ते ऐकून वसंतसेना त्याला प्रतिसंदेश देते की, ‘तू ह्या मदनिचा स्वीकार करावा.’ शर्विलक गोंधळतो. त्याला काही समजलं नाही असं सांगतो. तेव्हा वसंतसेना सांगते की,‘आर्य चारुदत्तांनी मला सांगितले होते की, जो ही आभूषणे तुझ्याकडे आणून देईल, त्याला तू मदनिका द्यावीस! म्हणजे चारुदत्तच एक प्रकारे तुला मदनिका देत आहेत!’ वसंतसेनेने आपल्याला ओळखले तर नाही ना? अशी शंका त्याला येते. पण वरवर चारुदत्ताला धन्यवाद देतो. तेव्हा वसंतसेना गाडीवानाला हाक मारते. तो गाडी तयार ठेवतो. ती मदनिकेला म्हणते की ‘मी तुला शर्विलकाच्या स्वाधीन केले आहे. आता गाडीत बसून त्याच्याबरोबर जा.’ तिला सोडून जाण्याच्या विचाराने मदनिकेला रडू येते. तेव्हा वसंतसेना ‘माझी आठवण ठेव’ असे सांगते. शर्विलक वसंतसेनेला ‘कल्याण होवो’ असा आशीर्वाद देऊन मदनिकेला वसंतसेनेच्या पाया पडायला सांगतो. नंतर मदनिकेसह गाडीत बसून जायला निघतो.
चौथ्या अंकातल्या तिसऱया दृश्यात पडद्याआडून एक घोषणा होते की, ‘भयभीत झालेल्या राजा पालक याने गोपालपुत्र आर्यकाला अंधारकोठडीत बंद केले आहे.’ ते ऐकून शर्विलकाला आपल्या प्रिय मित्राची अशी दुःखद स्थिती पाहून खूप खेद वाटतो. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी काय उपाय करता येईल याचा विचार करू लागतो. मदनिका त्याची नवी नवरी असूनही ती त्याला अडवत नाही. म्हणून शर्विलक गाडीवानाला समजावून तिला रेभिलच्या घरी सोडायला सांगतो आणि स्वतः मित्राला सोडवण्यासाठी निघतो. शर्विलक म्हणतो…
द्वयमिदमतीव लोके प्रियं नराणां सुह्रच्च वनिता च । संप्रति तु सुंदरीणां शतादपि सुह्रद्विशिष्टताम्।।
ह्या जगात मित्र आणि पत्नी ह्या दोन गोष्टी लोकांना अधिक प्रिय असतात. पण शेकडो सुंदर स्त्रियांपेक्षाही मित्र अधिक प्रिय असतो. म्हणून मित्राकडे दुर्लक्ष करू शकत नाही.








