राजधानीच्या दिशेने सशस्त्र बंडखोरांची कूच
वृत्तसंस्था / नैरोबी
इथियोपिया या आफ्रिकन देशामध्ये विरोधी टिग्रे दलांकडून राजधानीच्या दिशेने कूच करण्याची धमकी देण्यात आल्यावर आणि देशात एक वर्षापासून सुरू असलेले युद्ध तीव्र झाल्याने सरकारने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. इथियोपियामध्ये सुरक्षाविषयक स्थिती ‘अत्यंत खराब’ झाल्याचे म्हणत अमेरिकेने तेथे राहत असलेल्या स्वतःच्या नागरिकांना देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.
इथियोपियाच्या मंत्रिमंडळाने आणीबाणीची घोषणा केली आहे. पंतप्रधान अबी अहमद यांच्या सरकारकडून याच्या माध्यमातून संकटाचा स्पष्ट संकेत देण्यात आला आहे. टिग्रे क्षेत्रात मागील एक वर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. टिग्रे दल आणि त्याचे सहकारी देशाच्या अस्तित्वासाठी ‘गंभीर धोका’ निर्माण करत असल्याचे मंत्रिमंडळाने आणीबाणीची घोषणा करताना म्हटले आहे. ‘सर्वांची कसोटी लागणार’ असा ट्विट पंतप्रधानांनी केला आहे.
अदीस अबाबाला घेरण्याचा प्रयत्न
संघर्षाचा कालावधी कमी करणे आणि तोडग्यासाठी वेळ प्रदान करण्याच्या उद्देशाने ही घोषणा करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. अमेरिकेने डेसी आणि कोम्बोल्चाच्या रणनीतिक शहरांवर अलिकडेच कब्जा केलेल्या टिग्रे दलांना अदीस अबाबा शहराला ‘घेरण्या’च्या प्रयत्नांच्या विरोधात इशारा दिला आहे. आणीबाणी त्वरित लागू झाली असून ती पुढील 6 महिन्यांपर्यंत कायम राहणार आहे.
सरकारला वाढीव अधिकार

आणीबाणीदरम्यान सरकार संचारबंदी लागू करू शकते, नागरिकांना सैन्य प्रशिक्षणाचा आदेश देण्यासह वाहतूक सेवा तसेच प्रवासावर बंदी घालू शकते. याचबरोबर प्रसारमाध्यमांचे परवाने निलंबित करू शकते. दहशतवादी गटासोबत संबंध बाळगल्याप्रकरणी कुठल्याही व्यक्तीला अनिश्चित काळासाठी ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला यामुळे प्राप्त होणार आहे.
संयुक्त राष्ट्राकडून चिंता व्यक्त
काही क्षेत्रांमध्ये स्थानिक प्रशासनाला पायउतार केले जाऊ शकते आणि सैन्य नेतृत्व प्रस्थापित करण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे. अनधिकृत सार्वजनिक सोहळे आणि आणीबाणीला विरोध करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या घडामोडींवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. इथियोपिया आणि व्यापक क्षेत्राचे स्थैर्यच पणाला लागल्याचे म्हणत संयुक्त राष्ट्रसंघाने तत्काळ युद्धविरामाचे आवाहन केले आहे.









