वार्ताहर / मडकई
शिक्षण हे आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. आधुनिक शिक्षण प्रणाली आजच्या युगात शिक्षणात महत्त्वाची भुमिका बजावत आहे. आपले विचार व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. निरंतर वाचन करून आपले ज्ञान वृद्धिंगत करावे असे आवाहन प्रमुख पाहुणे शिक्षण तज्ञ कमलाकर म्हाळशी यांनी केले.
मडकई येथील श्री नवदुर्गा विद्यालयाच्या बक्षीस वितरण तसेच विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळय़ात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मडकई ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश नाईक, विद्यालयाचे प्रबंधक नामदेव नाईक, सरपंच लक्ष्मी तारी, मुख्याध्यापक दिनेश नाईक, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मधू गावडे, प्रा. सीमा सावंत आदी उपस्थित होते.
शिक्षकांनी खडतर प्रयत्न करून मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेकरीता तयार करून यंदाच्या वर्षी शंभर टक्के निकाल प्राप्त केला. या यशाबद्दल सुदेश नाईक यांनी शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सरपंच लक्ष्मी तारी यांनी सांगितले की अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे मनोबल वाढते व त्यामुळे पुढील कार्य करण्यास बळ मिळते व मुलांची अभ्यासातील गोडी वाढते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन तर शिक्षकांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे कमलाकर म्हाळशी यांना संस्थेकडून स्मृतचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन कमलाकर म्हाळशी यांच्याहस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख नामदेव नाईक यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजिता सिरसाट यांनी तर सुमित बोरकर यांनी आभार मानले.









