प्रतिनिधी / पणजी
म्हापसा नगरपालिकेच्या एकूण 20 वॉर्डांसाठी शुक्रवारी मतदान होऊन आज मतमोजणी होत आहे. गेली 15 वर्षे माजी मुख्यमंत्री स्व. ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा पालिका भाजपच्या हातात होती. ती धुरात आता त्यांचे पुत्र आमदार जोशुआ डिसोझा सांभाळत आहेत. आजच्या निकालानंतर जोशुआ डिसोझांचे नेतृत्व सिद्ध होणार असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. दुपारपर्यंत म्हापसा पालिकेवर जोशुआ डिसोझा की सुधीर कांदोळकर राज्य करणार हे स्पष्ट होणा आहे.
भाजपा पुरस्कृत म्हापसा विकास आघाडी, म्हापसेकरांचे एकवट की बोडगेश्वर विकास आघाडी निवडणुकीत बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने शुभांगी वायंगणकर, मनिषा कवळेकर, रुपा भक्ता यांचे घेतले जात असले तरी विजेता नाईक याही दावेदार आहेत मात्र मतदारांनी कुणाला मत दिले आहे यावरच सर्वांचे भवितव्य अवलंबून आहे.
सुधीर कांदोळकर इतिहास घडविणार
म्हापसेकरांचो एकवट गटाचे प्रमुख सुधीर कांदोळकर सलग सातव्यांदा मरड म्हापसा या 19 क्रमांकाच्या वॉर्डातून निवडणुकीत उतरले आहे. जर ते निवडून आले तर म्हापसात पालिकेतील एक नवीन विक्रम त्यांच्या नावावर होणार आहे. सर्वाज जास्त काळ म्हापशात निवडून येणारे ते नगरसेवक ठरणार आहेत. सुधीर कांदोळकर यांच्या विरोधात भाजपने आपली चाल चालवून माजी नगराध्यक्ष रेणुका उर्फ रुपा भक्ता यांना निवडणूक रिंगणात ठेवली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी कसून प्रयत्न केले आहेत. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही येथे प्रचार केला आहे. असे असले तरी मतदार कोणाबरोबर राहिले हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
दोन्ही गटांनी आपल्यालाच बहुमत मिळणार असल्याचा दावा केला असला तरी परिवर्तनाच्या नावाखाली वेगळाच लागू शकतो. या निवडणुकीत 3 ते 4 जागा अपक्ष उमेदवारांना मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पालिकेत त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी वेगळीच नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
सर्वांचे लक्ष दोन्ही पॅनलकडे
आमदार जोशुआ डिसोझा भाजपची 15 वर्षांची परंपरा राखून ठेवतात की म्हापसा पालिका म्हापशेकरांचे एकवट या बॅनरखाली सुधीर कांदोळकर यांच्या हातात जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. म्हापशात काही वॉर्डमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या असून यात वेगळाच निकाल लागत नवीन चेहरे पालिकेत पाहायला मिळू शकतात.









