अन्न सुरक्षा तपासणी अधिकाऱयांची पदे रिक्त
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरवासियांना दर्जेदार व सुरक्षित खाद्यपदार्थ मिळतात का? याची पाहणी करण्याची जबाबदारी अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरण मंडळाकडे (एफएसएसए) सोपविण्यात आली आहे. बेळगाव शहरासह जिल्हय़ातील हॉटेल, कॅन्टीन, बेकरी आणि स्वीटमार्ट अशा व्यवसायांच्या माध्यमातून विक्री करण्यात येणाऱया खाद्य पदार्थांचा दर्जा पाहणे आवश्यक आहे. पण सदर विभागाकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा तपासणी मोहीम बारगळली आहे.
खाद्य पदार्थांचा दर्जा व सुरक्षित अन्न देण्यात येते का? याची पाहणी महापालिकेच्या अन्न निरीक्षकांकरवी करण्यात येत होती. अन्न सुरक्षा निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता निरीक्षकांकरवी हॉटेल, कॅन्टीन व खाद्यपदार्थ विक्री करणाऱया दुकानांमध्ये धाड घालून विक्री करण्यात येणारे खाद्यपदार्थ खाण्यासाठी योग्य आहेत का? याची चाचपणी करण्यात येत होती. मात्र, राज्य शासनाने हा अधिकार गोठवला असून, खाद्य पदार्थांची तपासणी करण्यासाठी वेगळा विभाग निर्माण केला आहे. आरोग्य खात्याकडे ही जबाबदारी सोपवून त्याकरिता अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरण मंडळाची स्थापना केली आहे. सदर विभागाचे कामकाज प्रारंभी जिल्हा आरोग्य खात्याच्या अखत्यारित चालत होते. पण यासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करून अन्नसुरक्षा प्राधिकरण मंडळाच्या आयुक्तपदी स्वतंत्र अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. पण या विभागाकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्याने कामकाज करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
शहर आणि उपनगरात खाद्यपदार्थ विक्री करणारी असंख्य अस्थापने आहेत. रस्त्याशेजारी हातगाडी लावून खाद्यपदार्थ विक्री करण्यात येतात. पण हे खाद्यपदार्थ कितपत सुरक्षित आहेत. याची पाहणी करण्यासाठी अन्न सुरक्षा प्राधिकरण मंडळाकडे अधिकारीच नाहीत. त्यामुळे सदर कार्यालय केवळ परवाने देण्यापुरते कार्यान्वित आहे. अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांमध्ये भेसळयुक्त साहित्य वापरले जाते. ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून खाद्यपदार्थ बनविले जातात. खाद्यपदार्थ विक्री करण्यात येणाऱया ठिकाणी अस्वच्छता असते. पण याची पाहणी करण्यासाठी अन्न सुरक्षा प्राधिकरण मंडळाकडे अधिकारीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे शहरवासियांचे आरोग्य रामभरोसे आहे. शहर व उपनगरात विक्री करण्यात येणारे खाद्यपदार्थ, स्नॅक्स, फास्ट फूड खाण्याकडे नागरिकांचा ओढा मोठय़ा प्रमाणात आहे. पण हे खाद्यपदार्थ सुरक्षित आहेत का? याची पाहणी कोण करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
बेकरीमध्ये तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ तसेच स्वीटमार्टमधील खाद्यपदार्थ नाशवंत असल्याने त्यावर एक्स्पायरी डेट घालण्याचा आदेश केंद्र शासनाने बजावला आहे. याची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. पण राज्य शासनाने याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणताच आदेश बजावला नाही. मात्र, शहर-उपनगरात काही व्यावसायिक एक्स्पायरी डेट घालून खाद्य पदार्थांची विक्री करीत आहेत. पण अन्य ठिकाणी याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे एक्स्पायरी डेट घातली आहे की नाही तसेच विक्री करण्यात येणारे खाद्यपदार्थ सुरक्षित आहेत का? याची माहिती घेण्यासाठी जिल्हा अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरण मंडळाकडे केवळ एकच अधिकारी आहे. त्यांच्याकडे संपूर्ण जिल्हय़ाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सध्या जिल्हय़ासाठी एक अधिकारी व कंत्राट पद्धतीने संगणक ऑपरेटर आणि वाहनचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. वडगाव येथील नगर आरोग्य केंद्राच्या शेजारी असलेल्या इमारतीमध्ये कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सदर कार्यालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अडगळीत बसून अधिकाऱयांना व संगणक ऑपरेटरना काम करावे लागत आहे.
कॅन्टीन, हॉटेल, हातगाडय़ा, बेकरी, स्वीटमार्ट दुकानांची पाहणी करण्यासाठी बेळगाव जिल्हय़ात अकरा अन्न सुरक्षा अधिकाऱयांची पदे रिक्त आहेत. प्रत्येक तालुक्मयाला एक याप्रमाणे तसेच महापालिका व्याप्तीमध्ये एका अधिकाऱयाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. पण ही पदे रिक्त असल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांकडे सोपविण्यात आली आहे. जिल्हय़ातील चार तालुक्मयांमध्ये तालुका आरोग्य अधिकाऱयांकडे या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. पण बेळगाव महापालिका व्याप्तिमध्ये या पदावर अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली नाही. शहरात भाजी मंडई आणि भाजी मार्केटमध्ये विक्री करण्यात येणाऱया भाजीपाल्यांची तपासणी करण्याची जबाबदारी देखील या विभागाकडे आहे. पण भाजीपाल्याची तपासणी कधीच केली जात नाही. त्यामुळे रिक्त असलेली पदे कधी भरणार आणि खाद्यपदार्थांची तपासणी कधी करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
प्रयोगशाळेचा अभाव
अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. पण खाद्य पदार्थांचा दर्जा तपासण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळेची आवश्यकता आहे. मात्र शासनाने ही तरतूद शहरात केली नाही. खाद्य पदार्थांचा दर्जा तपासण्यासाठी बेंगळूर येथील प्रयोगशाळेला खाद्यपदार्थांचा नमुना पाठवावा लागतो. बेळगावमध्ये केवळ कच्च्या खाद्यपदार्थांच्या साहित्याच्या नमुन्याची तपासणी केली जाते. त्यामुळे खराब खाद्यपदार्थांचा नमुना कसा तपासणार हादेखील मुद्दा ऐरणीवर आला आहे. अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरण मंडळासाठी अधिकारी, प्रशस्त कार्यालय आणि सुसज्ज प्रयोगशाळेची आवश्यकता आहे.
कॅन्टीन, हॉटेल किंवा खाद्यपदार्थ तयार करणे आणि विक्री करणे याकरिता अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरण मंडळाकडे नोंदणी करणे किंवा परवाना घेणे बंधनकारक आहे. याकरिता आवश्यक कागदपत्रांची जोडणी करावी लागते. सध्या या कार्यालयामार्फतच परवाना व नोंदणी करण्यात येते. पण खाद्यपदार्थ विक्री करणाऱया अस्थापनांची चाचपणी केली जात नाही. त्यामुळे हा विभाग केवळ परवाना देण्यासाठीच आहे का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.









