प्रतिनिधी / बेळगाव
श्रीनगर रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आले आहे. मात्र येथील अन्य कामे अर्धवट व धिम्या गतीने करण्यात येत असल्याने रहिवाशांना अडथळय़ाच्या शर्यती पार कराव्या लागत आहेत. येथील डेनेजवाहिन्या घालण्याचे काम महिन्याभरापासून करण्यात येत आहे. पण काही ठिकाणी केवळ खोदाई करून ठेवण्यात आल्याने रहिवाशांना धोकादायक बनले आहे.
येथील डबल रोडचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्याचे काम अडीच वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. पण सदर काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. केवळ काँक्रिटीकरण आणि दुभाजकाचे काम पूर्ण झाले आहे. गटारीचे बांधकाम आणि ड्रनेज वाहिन्याचे काम शिल्लक आहे. काही ठिकाणी गटारीमध्ये डेनेज चेंबर आल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. याबाबत तक्रारी करण्यात आल्याने नव्याने ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे काम महिन्याभरापूर्वी सुरू करण्यात आले आहे. सदर काम सुरू असताना काही ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. पण कामामधे सातत्य नसल्याने सदर काम कुर्मगतीने सुरू आहे. काहीठिकाणी डेनेज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी केवळ खोदाई करून सोडुन दुसरीकडेच काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी ठिकठिकाणी हे काम अर्धवट आहे. डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने घरासमोर चरी निर्माण झाल्या आहेत. तसेच त्यामध्ये सांडपाणी साचुन राहत असल्याने दुर्घंधी पसरत आहे. त्याचप्रमाणे डासांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्यावेळी चरीचा अंदाज येत नसल्याने पादचारी पडण्याचे प्रकारही घडत आहेत.
स्मार्ट सिटी कामाबाबत नेहमीच तक्रारी होत असतात. तरी देखील कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई केली जात नाही. त्यामुळे तक्रारी करून नागरिक देखील हैराण झाले आहेत. हा रस्ता वर्दळीचा असल्याने तातडीने पूर्ण करून मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले पण अन्य कामे धिम्या गतीने सुरू असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. आणखीन किती वर्षे काम चालणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. अर्धवट असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत व घरासमोर खोदण्यात आलेल्या चरीमध्ये ड्रनेज वाहिन्या घालून चरी बुजविण्यात याव्यात, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.









