बोर्डर-गावसकर चषक कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज
ब्रिस्बेन / वृत्तसंस्था
सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे गर्वहरण केल्यानंतर आता येथील चौथ्या व शेवटच्या कसोटीत ताज्या दमाने आणखी एकदा आक्रमण करण्यावर भारतीय क्रिकेट संघाचा भर असेल. एकीकडे, बोर्डर-गावसकर चषक आपल्याकडे खेचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला विजयाची नितांत गरज असेल तर चषक आपल्याकडे कायम राखण्यासाठी भारताला केवळ बरोबरी देखील पुरेशी ठरणार आहे. उभय संघातील या लढतीत पहिल्या दिवसाच्या खेळाला पहाटे 5.30 वाजता सुरुवात होईल.
रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत व हनुमा विहारी यांनी सिडनीत अतिशय जिद्दीने, संघर्षपूर्ण खेळ साकारला. जसप्रित बुमराहने प्रचंड वेदना असताना देखील अनुभव पणाला लावला आणि तीन दशकांपूर्वी माल्कम मार्शलने मनगटाला प्रॅक्चर झालेले असतानाही ज्या तडफेने खेळ साकारला होता, त्याची पुनरावृत्ती तेथे रविंद्र जडेजाने केली.
सिडनीत भारतीय संघ प्रत्येक आघाडीवर लढला. गॅलरीतून वर्णद्वेषी टिपणीचा सामना केला, यष्टीमागून होणाऱया स्लेजिंगशी मुकाबला केला आणि ऑस्ट्रेलियन जलद त्रिकुटाचा तिखट माराही परतावून लावला. विराट कोहलीने जी आक्रमकता संघात रुजवली, बिंबवली, तीच आक्रमकता आता ऑस्ट्रेलियाला नव्याने झुंजणे भाग पाडू शकेल. ऑस्ट्रेलियाने 1988 पासून ब्रिस्बेनवर एकही कसोटी गमावलेली नाही. पण, या क्षणी हा इतिहासही खंडित होऊ शकतो.
ब्रिस्बेनच्या कठीण खेळपट्टीवर जडेजा साथीला नसेल, बुमराहबद्दल शेवटच्या क्षणी काहीही निर्णय होऊ शकतो. बहुतांशी खेळाडू दुखापतीशी झगडत आहेत. पण, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सर्व दुखापतग्रस्त खेळाडूंवर मेहनत घेत आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले तर बुमराहसारखा खेळाडू अंतिम क्षणी खेळूही शकतो.
उसळत्या गोलंदाजीला पोषक स्थिती
ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनकरिता ब्रिस्बेनसारखी दुसरी खेळपट्टी नाही. ब्रिस्बेनमध्ये उसळत्या गोलंदाजीला पोषक स्थिती असते आणि याचा लाभ घेण्याचा यजमान संघाचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे. अर्थात, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व रोहित शर्मा या तीन वरिष्ठ खेळाडूंकडून जोरदार खेळ साकारला गेल्यानंतर सामन्यात निश्चितच रंगत येऊ शकते. फलंदाजी खोलवर असावी, यासाठी भारतीय संघ पाचऐवजी चार गोलंदाज खेळवण्याची शक्यता चर्चेत आहे.
मयांक अगरवाल उपलब्ध असेल तर त्याला तिसऱया स्थानी उतरवता येऊ शकते. रोहित-शुभमन सलामीला येऊ शकतात तर मध्यफळीत पुजारा व रहाणे यांच्यावर जबाबदारी असेल. रविंद्र जडेजाच्या जागी पृथ्वी शॉ की वृद्धिमान साहा, हे अद्याप निश्चित होणे बाकी आहे. पण, यासाठी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची शक्यताही चर्चेत आहे.
नवदीप सैनी व मोहम्मद सिराज यांना एकत्रित केवळ तीन कसोटी सामन्यांचा अनुभव आहे आणि दोन वर्षांपूर्वी पदार्पणाच्या कसोटीत केवळ 10 चेंडू टाकलेल्या शार्दुल ठाकुरकडून संघव्यवस्थापनाला फारशी अपेक्षा करता येणार नाही, अशी स्थिती आहे. बुमराह खेळण्याची शक्यता अंधुक आहे, याची विक्रम राठोडना देखील कल्पना आहे. पण, तूर्तास आपले पत्ते राखून ठेवण्याची खुबी त्यांनी दर्शवली आहे. अर्थात, बुमराह खरोखरच खेळू शकला नाही तर डेव्हिड वॉर्नर, लाबुशाने व स्टीव्ह स्मिथसारख्या जागतिक दर्जाच्या कसलेल्या फलंदाजांना रोखण्याचे महाकाय आव्हान नवख्य़ा भारतीय गोलंदाजांसमोर आ वासून उभे असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
ऑस्ट्रेलिया ः टीम पेन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशाने, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरुन ग्रीन, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हॅझलवूड.
भारत ः अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, जसप्रित बुमराह, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर.
सामन्याची वेळ ः पहाटे 5.30 पासून.
कोटस
अंतिम संघनिवड अंतिम क्षणीच केली जाईल. दुखापतग्रस्त खेळाडूंवर आमचे वैद्यकीय पथक मेहनत घेत आहे. बुमराह जर तंदुरुस्त असेल तर तो निश्चितपणाने खेळेल. पण, तंदुरुस्त नसेल तर आम्ही धोका स्वीकारणार नाही.
-फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड
सुनील गावसकरांनी केलेली टीका माझ्या ऐकिवात आली. पण, मी त्यांना सांगू इच्छितो की, यामुळे आम्ही किंचीतही विचलित नाही. स्टीव्ह स्मिथ आरोपामुळे निराश झाला. पण, तो ही पूर्ण निर्धाराने भारतीय संघाचा बीमोड करेल.
-ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन
ऑस्ट्रेलियन सलामीवीर विल पुकोवस्की दुखापतीमुळे बाहेर

नवोदित ऑस्ट्रेलियन सलामीवीर विल पुकोवस्की खांद्याच्या दुखापतीमुळे या कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचे सामन्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट झाले. मार्कस हॅरिस हा त्याची जागा घेईल. पुकोवस्कीने यापूर्वी सिडनीतील कसोटी सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले होते. अनिर्णीत राहिलेल्या त्या तिसऱया लढतीच्या शेवटच्या दिवशी पुकोवस्कीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. हॅरिस या पूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियन संघासमवेतच आहे. पण, गतवर्षी ऍशेसनंतर त्याला एकही कसोटी सामन्याची संधी मिळालेली नाही. त्याच्या खात्यावर 9 कसोटीत 385 धावा आहेत.









