कोलंबो / वृत्तसंस्था
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये अव्वलस्थानी विराजमान असलेल्या माजी लंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने रविचंद्रन अश्विनमध्ये 800 बळी घेण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन गुरुवारी केले. सध्या अश्विनच्या खात्यावर 74 सामन्यात 377 बळी नोंद आहेत.
ऑस्ट्रेलियाचा नॅथन लियॉनने आजवर 396 बळी घेतले आहेत. पण, मुरलीधरनला लियॉनपेक्षा अश्विन अधिक सरस वाटतो. लियॉन प्रगल्भ गोलंदाज आहे. पण, हा माईलस्टोन सर करण्यासाठी त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असे मुरलीधरन म्हणतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱया पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये मुरलीधरन (133 सामन्यात 800 बळी), शेन वॉर्न (145 सामन्यात 708 बळी), अनिल कुंबळे (132 सामन्यात 619 बळी), जेम्स अँडरसन (156 सामन्यात 600 बळी), ग्लेन मॅकग्रा (124 सामन्यात 563 बळी) यांचा समावेश आहे.
मुरलीधरन सध्या लंकन क्रिकेटशी संलग्न नाही. पण, आयपीएल स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघाचे तो प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. शिवाय, लंकेत त्याचा ऍल्युमिनियम कॅनिंग व्यवसायही आहे.









