बेंगळूर
राज्यात तीन दिवसांपूर्वी पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटकडून कोविशिल्ड लसीचे 6.47 लाख डोस बेंगळुरात दाखल झाले होते. तर बुधवारी 1.47 लाख डोस बेळगावात आले होते. आता गुरुवारी सकाळी कोव्हॅक्सिनचे 20 हजार डोस बेंगळूरमध्ये दाखल झाले आहेत. ते आनंदराव सर्कल येथील आरोग्य खात्याच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आले आहेत. राज्यात प्राधान्यक्रमाने कोविशिल्ड लसीचा अधिक वापर होणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लस म्हणून कोव्हॅक्सिनलाही मान्यता देण्यात आली आहे. गुरुवारी हैदराबाद येथून भारत बायोटेक कंपनीकडून कोव्हॅक्सिन लसीचे 20 हजार डोस बेंगळूरला पाठविण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत कोविशिल्डचे 7.94 लाख डोस तर कोव्हॅक्सिनचे 20 हजार डोस असे एकूण 8.14 लाख डोस उपलब्ध झाले आहेत.









