वृत्तसंस्था/ पॅरीस
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याचे भारताच्या महिला तिरंदाजी संघाचे स्वप्न संपुष्टात आले आहे. पॅरीसमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक पात्र फेरीच्या तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या विश्वचषक विजेत्या महिला रिकर्व्ह संघाला कोलंबियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघ टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाही. पॅरीसमधील ही शेवटची पात्र फेरीची स्पर्धा होती.
आता 23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताची महिला तिरंदाजपटू दीपिका कुमारी ही एकमेव पात्र ठरली आहे. दीपिका कुमारीची ही तिसरी ऑलिंपिक स्पर्धा आहे. मात्र भारताच्या पुरूष रिकर्व्ह तिरंदाज संघाने टोकियो ऑलिंपिकसाठी आपली पात्रता यापूर्वी सिद्ध केली आहे.









