वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेला जाणाऱया भारतीय पथकासाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) रविवारी 10 कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटना आणि क्रीडा मंत्रालयाने केलेल्या विनंतीनुसार बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली तसेच सचिव जय शहा या बैठकीला उपस्थित होते. टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय पथकाला बीसीसीआयने आपला पाठिंबा दर्शविला आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या भारताच्या इलाईट ऍथलीट्ससाठी या निधीचा वापर केला जाईल. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत.









