स्ट्रँडा मेमोरियल बॉक्सिंग चॅम्पियनशिप, झरीनलाही जेतेपदाची आशा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बल्गेरियातील सोफिया येथे सुरू असलेल्या 73 व्या स्ट्रँडा मेमोरियल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या नितूने महिलांच्या 48 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत तिने इटलीच्या एरिका प्रिसियांद्रोचा पराभव केला.
नितूने अंतिम लढतीत प्रिसियांदोवर 5-0 अशा गुणांनी एकतर्फी विजय मिळविला. प्रिसियांदो ही माजी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यविजेती बॉक्सर आहे. आपल्या उंचीचा फायदा घेत नितूने प्रतिआक्रमणाच्या खेळावर भर देत हे यश मिळविले. भारताची माजी युवा वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीनची (52 किलो गट) लढत युक्रेनच्या तेतियाना कोबशी होणार आहे. 2019 मध्ये झालेल्या स्ट्रँडा मेमोरियल स्पर्धेत झरीनने सुवर्णपदक पटकावले होते. मागील आवृत्तीत भारताने दोनच पदके (1 रौप्य, 1 कांस्य) मिळविली होती.
यावेळी सहभागी झालेल्या पुरुष संघाची कामगिरी मात्र निराशाजनक झाली. एकूण सात जणांनी भाग घेतला होता आणि त्यापैकी एकालाही पदकाच्या फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. यावर्षीच्या स्पर्धेत 36 देशांच्या 450 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला असून कझाक, इटली, रशिया, फ्रान्स, युक्रेन या बडय़ा संघांचा त्यात समावेश आहे. रशियाला प्रमुख देशांनी युद्ध टाळण्याचे आवाहन केले असले तरी त्याला दाद न देता रशियाने युक्रेनवर मिलिटरी कारवाईला सुरुवात केली असून अनेक त्यांच्या हल्ल्यात सैनिक व नागरिकांनी प्राण गमावले आहेत.









