प्रतिनिधी/ कराड
कराड नगरपालिकेस पाणी पाणीपुरवठा करणाऱया वारुंजी जॅकवेलकडे जाणारी महावितरणची 11 के. व्ही. इलेक्ट्रिक केबल राष्ट्रीय महामार्गालगत कोयना नदीच्या पुलाजवळ डांगे वस्तीजवळ कचऱयाला आग लागल्यामुळे पेटली होती. त्याच्या दुरूस्तीचे काम महावितरणने रविवारी सायंकाळी पूर्ण केले. मात्र यामुळे निम्म्या शहरात दीड दिवस पाणी पुरवठा झाला नाही. नागरिकांची पाण्याअभावी मोठी गैरसोय झाली.
वारूंजी जॅकवेलमधून कोयना नदीतील पाण्याचा उपसा करण्यात येतो. काल पंकज हॉटेलसमोर कचरा पेटल्याने 11 के. व्ही. ची केबलही पेटली होती. त्यामुळे पाणी उपसा बंद झाला होता. केबल जळाल्याने ती दुरूस्त करण्याचे काम महावितरणने युद्धपातळीवर सुरू केले होते. मात्र हे काम अतिशय क्लिष्ट असल्याने त्यास वेळ लागला. रविवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही केबल पूर्ववत जोडण्यात आली. त्यानंतर चाचणी घेऊन पाण्याच्या टाक्या भरण्याचे काम सुरू झाले. यातून रात्री शहरास पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
शनिवारी सकाळी पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र कपातीच्या नावाखाली शनिवारी सायंकाळी पालिकेकडून पाणी पुरवठा होत नाही. परिणामी नागरिकांकडे शिल्लक पाण्याचा वापर झाला होता. अशा स्थितीत रविवारी सकाळी सुटणारे पाणी नागरिकांच्या उपयोगी पडते. मात्र केबल जळाल्याने रविवारी सकाळी व सायंकाळीही पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दिवसभर नागरिक पाणी कधी येणार, याची विचारणा करताना दिसत होते. रविवारी सायंकाळी दुरूस्तीचे काम पूर्ण रात्री झाल्यानंतर पाणी देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, सकाळी सोमवार, मंगळवार पेठेसह परिसरात पाणी पुरवठा झाला होता. मात्र अन्य भागात पाणी पुरवठा झाला नाही. दीड दिवस पाणी न मिळाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे ज्या भागात पाणी पुरवठा झालेला नव्हता, त्या भागात प्राधान्याने पाणी देण्याचे नियोजन नगरपालिकेने केले होते.
शहरालगतच्या कचऱयाचे काय?
कराड शहरातील कचऱयाचे व्यवस्थापन होत असले तरी कराडच्या तिन्ही प्रवेशद्वारावर हद्दीबाहेर कचऱयाचे प्रमाण जास्त आहे. सैदापूर, वारूंजी, पंकज हॉटेल महामार्ग, कार्वे रस्ता, जुना कोयना पूल या रस्त्यांवर कचरा पडण्याचे प्रमाण जास्त आहे. पंकज हॉटेलसमोर महामार्गालगत असणारा कचरा पेटल्याने पालिकेची केबल जळाली. त्यामुळे शहरालगतच्या कचऱयाचा उपद्रव कराडकरांना होत असल्याचे दिसत आहे.









