प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासून भाजीपाल्यांच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईबरोबर भाजीपाल्यांच्या वाढत्या दराचे चटके सहन करावे लागत आहेत. सर्वच भाजीपाल्यांचे दर आवाक्मयाबाहेर गेल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे. बिन्स, फ्लॉवर, कोबी, वांगी, दोडकी, भेंडी, गवार यासह इतर भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला कसा खरेदी करावा, असा प्रश्न पडला आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात बिन्स 50 रु. किलो, दोडकी 80 रु. किलो, गाजर 50 रु. किलो, फ्लॉवर 30 रु. एक नग, कांदे 30 ते 40 रु. किलो, ढबू 100 रु. किलो, वांगी 80 रु. किलो, टोमॅटो 40 रु. किलो, हिरवा वाटाणा 50 रु. किलो, भेंडी 80 रु. किलो, गवार 80 रु. किलो, कारली 80 रु. किलो, कोबी 40 रु. एक, काकडी 80 रु. किलो, कांदापात 20 रु. चार पेंढय़ा, मेथी 50 रु. चार पेंढय़ा, लालभाजी 20 रु. तीन पेंढय़ा, पालक 10 रु. दोन पेंढय़ा, शेपू 10 रुपयाला एक पेंढी, कारली 80 रु. किलो, मुळा 30 रुपयांना 12 नग, लिंबू 10 रुपयांना पाच नग दराने विक्री होत आहे.
मागील महिन्याभरापासून भाजीपाल्यांचा दरात मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने भाजीपाला पिकाला फटका बसला होता. त्यामुळे काही दिवसांपासून भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्येदेखील भाजीपाल्यांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी भाजीपाल्यांचे दर भडकल्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे हाताबाहेर गेले आहे.









