विभागीय नियंत्रण अधिकाऱयांना निवेदन : अपुऱया-अनियमित बससेवेमुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल
प्रतिनिधी / बेळगाव
अपुऱया व अनियमित बससेवेमुळे गोल्याळी, बडस, बेळवट्टी व बेळगुंदी भागातील सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल होत असून तातडीने या भागातील बससेवा सुरळीत करावी, अशा मागणीचे निवेदन विभागीय नियंत्रण अधिकारी एम. आर. मुंजी यांना देण्यात आले. तातडीने बससेवा सुरळीत करा अन्यथा रास्ता रोको करून आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
बेटगेरी, बाकनूर, मोरब, इनास बडस, बिजगर्णी आदी भागातील प्रवासी व विद्यार्थ्यांना केवळ गेल्याळी-बेळगाव या एकच बससेवेचा आधार आहे. या भागातून शहराकडे येणाऱया कामगार व विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र अपुऱया बससेवेमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गोल्याळी व बेळगाव बसच्या दिवसभरात केवळ दोन फेऱया होत असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. बस वेळेत येत नसल्यामुळे पासधारक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत
आहे.
बहुतांशी गावच्या बसेस लॉकडाऊनपासून अद्यापही बंदच
बेळगुंदी भागातील बहुतांशी गावच्या बसेस लॉकडाऊनपासून अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेळगुंदी भागातील राकसकोप, सोनोली, धामणे (एस), कावळेवाडी आदी गावातील नागरिकांना अपुऱया बसफेऱयांमुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. अनियमित बससेवेमुळे शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून गोल्याळी, बडस, बिजगर्णी गावच्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. तर वस्तीची बस देखील बंद असल्याने रात्री उशिराने प्रवास करणारे प्रवासी बसथाब्यांत ताटकळत थांबलेले पहायला मिळत आहेत. त्यामुळे गोल्याळी-बेळगाव व बेळगुंदी भागातील बससेवा सुरळीत करावी, या मागणीचे निवेदन विभागीय नियंत्रण अधिकाऱयांना देण्यात आले. यावेळी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, एन. के. नलवडे यांच्यासह नामदेव शिवगेकर, यशवंत पाटील यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.









