नगरसेवक रवी साळुंके यांनी घेतली भेट
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी प्रचारासाठी येण्याची तयारी केली होती. परंतु कोरोना नियमावलीमुळे प्रचारासाठी येता आले नाही. लवकरच बेळगावला येणार असून, सर्व पदाधिकारी व सीमावासीयांच्या व्यथा जाणून घेईन अशी ग्वाही सीमा समन्वय मंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंके यांच्याकडे दिली.
रवी साळुंके यांनी मुंबई येथे एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेतली. येत्या दोन वर्षात होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करणे आवश्यक आहे. रस्त्यावरची लढाई लढायची असेल तर विधानसभेत आमदार पाठविणे गरजेचे आहे. त्यामुळे सीमा समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान एकदा तरी बेळगावला भेट देऊन मोर्चेबांधणी करावी, गावो गावी जाऊन भेटी द्याव्यात, असे साळुंके यांनी सांगितले. लवकरच बेळगावला येवून म. ए. समितीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देवू अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. यावेळी आनंद टपाले, आप्पाजी बस्तवाडकर, दशरथ नांगरे, प्रतिक गुरव, सुमंत जाधव यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









