प्रतिनिधी / बेंगळूर
दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी प्रजासत्ताक दिनी म्हणजेचे 26 जानेवारीला ट्रक्टर रॅली काढणार आहेत. याला पाठिंबा देत राज्यातही 26 जानेवारीला आंदोलन छेडण्याचा निर्णय शेतकऱयांनी घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत कृषी कायद्यांना विरोध दर्शवून शेतकरी दिवस-रात्र आंदोलन करीत आहे. तरीही केंद्र सरकार शेतकऱयांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने 26 जानेवारीला दिल्लीत होणाऱया आंदोलनात ट्रक्टरांसह 10 हजारांपेक्षा अधिक वाहने सहभागी होणार आहेत.
दिल्लीत शेतकऱयांनी छेडलेल्या आंदोलनाला राज्यातील शेतकऱयांनीही पाठिंबा दिला आहे. राज्य रयत संघासह अनेक संघटनांनी पाठिंब्याची घोषणा केली असून 26 जानेवारीला बेंगळुरात ट्रक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मेळावा घेण्यात येणार असून हजारो शेतकरी यामध्ये सहभागी होतील, असे शेतकरी प्रमुख कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी सांगितले आहे.
तुमकूर नाईस रस्ता जंक्शनपासून रॅलीला प्रारंभ होणार आहे. हैदराबाद-कर्नाटक, मुंबई-कर्नाटक, म्हैसूर-मडिकेरी भागातील शेतकरी या आंदोलनात सहभाग घेणार आहेत.









