प्रतिनिधी / बेंगळूर
हासन येथील विमानतळासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची भेट घेणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ देण्याची मागणी केली आहे, असे निजद सर्वेसर्वा तथा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सांगितले. हासन येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
देवेगौडा पुढे म्हणाले, भेटीदरम्यान, हासन विमानतळाचे काम सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. हासनला येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असून आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पिके निर्यात करण्याची संधी आहे. त्यामुळे शहराला विमानतळाची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
जिल्हय़ाचा विकास झाल्यास त्याचा लाभ पर्यटकांनाही होणार आहे. हासन जिल्हय़ाचा संपूर्ण विकास करण्याचे आपले स्वप्न आहे. 2023 पर्यंत आपल्याला 90 वर्षे पूर्ण होणार असून तोपर्यंत येडियुराप्पा सत्तेवर राहणार आहेत. भाजपचा अवधी संपण्यापूर्वी हासन येथील विमानतळाचे उद्घाटन व्हावे अशी आपली इच्छा आहे, असे देवेगौडा यांनी सांगितले.









