मंत्री शशिकला जोल्ले यांची माहिती : केंद्राकडे पाठविला प्रस्ताव
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात नूतन दोन हजार अंगणवाडी सुरू करण्याची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. रविवारी होसकोटे येथील सावित्रिबाई फुले अंगणवाडी केंद्रात आयोजित राष्ट्रीय कन्या दिवस कार्यक्रमात सहभागी होऊन त्या बोलत होत्या.
मंत्री जोल्ले पुढे म्हणाल्या, राज्यात मिनी अंगणवाडी सुरू करण्याची मागणी असल्याने याची पाहणी करण्यात येत आहे. अंगणवाडी केंद्रातून महिला आणि मुलांना अंडय़ांचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी लागणाऱया रकमेत वाढ करण्याची मागणी असून अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा कतर अंडी खरेदी करून वितरीत करण्याचे कार्य सुरू आहे. विभागीय निविदा प्रक्रियेद्वारे तालुका पंचायतीकडून अंडी वितरीत करण्याबाबतचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना काळात स्थगित झालेल्या कुपोषित मुलांची आरोग्य तपासणी येत्या मार्च-एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात येईल. प्रत्येक वर्षाच्या 24 जानेवारीला केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय कन्या दिवस साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वपूर्ण योजना असून देश समृद्ध, सुरक्षित आणि विकासाच्या मार्गाकडे जाण्यासाठी निरोगी बालकांचा जन्म होणे आवश्यक आहे, असेही मंत्री जोल्ले म्हणाल्या.









