मृतांमध्ये 12 मुलांचा समावेश – जखमींपैकी 7 जण गंभीर
वृत्तसंस्था / सोफिया
दक्षिणपूर्व युरोपीय देश बुल्गारियामध्ये मंगळवारी पहाटे एका बसला अचानक आग लागली. या दुर्घटनेत 45 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 12 मुलांचा समावेश आहे. याचबरोबर 7 प्रवासी गंभीर स्वरुपात होरपळले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही दुर्घटना मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमधील बहुतांश जण उत्तर मॅसेडोनियाचे रहिवासी होते. घटनास्थळी लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. बसमध्ये कशामुळे आग लागली याची चौकशी केली जात असल्याचे अंतर्गत मंत्रालयातील अग्निसुरक्षा विभागाचे प्रमुख निकोलाई निकोलोव्ह यांनी सांगितले आहे.
बुल्गारियाचे अंतरिम पंतप्रधान स्टीफन यानेव यांनी या दुर्घटनेला मोठी आपत्ती ठरविले आहे. बसमधील बहुतांश प्रवासी जळून खाक होण्याइतकी ही आग भयानक होती. दुर्घटनेची छायाचित्रे अत्यंत भयावह असून यापूर्वी असे दृश्य कधीच पाहिले नव्हते, असे उद्गार गृहमंत्री बॉयको रश्कोव्ह यांनी काढले आहेत.
तांत्रिक बिघाडाचा संशय
उत्तर मॅसेडोनियाच्या ट्रव्हल एजन्सीच्या चार बसेस सोमवारी रात्री उशिरा तुर्कस्तानातून बुल्गारियामध्ये दाखल झाल्या. चालकाची चूक किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली असावी. ही दुर्घटना सोफिया शहरापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर स्ट्रोमा महामार्गावर घडली असल्याची माहिती बुल्गेरियाई इन्व्हेस्टिगेटिव्ह सर्व्हिसचे प्रमुख बोरिसलाव सराफोव यांनी दिली आहे.









