खेळाच्या तिसऱया दिवशी पावसाचा अडथळा, लंका अद्याप 162 धावांनी पिछाडीवर
वृत्तसंस्था/ गॅले
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवशी पावसाचा अडथळा आल्याने जवळपास दोन तासांचा खेळ वाया गेला. या कसोटीत तिसऱया दिवसाअखेर विंडीजने पहिल्या डावात 80 षटकात 9 बाद 224 धावा जमविल्या असून यादरम्यान त्यांनी संभाव्य फॉलोऑन टाळला. या लढतीत लंकेचा संघ अद्याप 162 धावांनी आघाडीवर आहे. सामन्यात खेळाचे शेवटचे दोन दिवस बाकी राहिले असून निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे अगोदर खेळाला प्रारंभ होईल.
सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी 38 षटकांचा खेळ झाला आणि विंडीजने आणखी तीन गडी गमवित 101 धावांची भर घातली. विंडीजने 6 बाद 123 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. होल्डर आणि मेयर्स या जोडीने सातव्या गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी केली.
खेळाच्या पहिल्या सत्रात धनंजय डिसिल्वाने विंडीजची ही जोडी फोडताना मेयर्सला करुणारत्नेकरवी झेलबाद केले. मेयर्सने 62 चेंडूत 8 चौकारांसह 45 धावा जमविल्या. जेसन होल्डर आठव्या गडय़ाच्या रुपात तंबूत परतला. जयविक्रमाने होल्डरला चमिराकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 60 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 36 धावा जमविल्या. कॉर्नवॉल आणि डिसिल्वा यांनी नवव्या गडय़ासाठी 49 धावांची भागीदारी करत संघाचा फॉलोऑन टाळला. लंकेच्या लकमलने कॉर्नवॉलला मेंडीजकरवी झेलबाद केले. त्याने 58 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 39 धावा जमविल्या. डिसिल्वा 11 धावावर खेळत आहे.
उपाहारापर्यंतच्या खेळात लंकेच्या फिरकी गोलंदाजांना अधिक यश मिळू शकले नाही. मेयर्स आणि होल्डर या विंडीजच्या फलंदाजांनी एकेरी आणि दुहेरी धावावर अधिक भर देत धावफलक हलता ठेवला. मेयर्सने मारलेला फटका सूर मारत करुणारत्नेने अप्रतिम टिपला. लंकेला दुसरा नवा चेंडू उपलब्ध झाला. पण, त्यांना पावसामुळे खेळाच्या शेवटच्या सत्रात थांबावे लागले. लंकेतर्फे जयविक्रमाने 38 धावात 3, रमेश मेंडीसने 75 धावात 3 तसेच लकमल आणि डिसिल्वा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – लंका प. डाव – सर्व बाद 386, विंडीज प. डाव-80 षटकात 9 बाद 224 (ब्रेथवेट 41, ब्लॅकवूड 20, मेयर्स 45, होल्डर 36, डिसिल्वा खेळत आहे 11, कॉर्नवॉल 39, रमेश मेंडीज 3-75, जयविक्रमा 3-38, लकमल 1-10, डिसिल्वा 1-11).









